नवी मुंबई: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मानवतावादी आणि क्रांतिकारी विचारांचे आजच्या युवा वर्गाने अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक मातंग समाज महासंघ आणि उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संदीप नाईक उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. कष्टकरी,श्रमिक, वंचितांना जगण्याचे बळ दिल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईच्या सामाजिक विकासात मातंग समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे मातंग समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम आग्रही राहिलेले आहेत. या समाजाच्या नेतृत्वाला नाईक यांनी नेहमीच सन्मानाचे स्थान दिले आहे. यापुढे सुद्धा मातंग समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. मातंग समाजाचे आजवर घनिष्ठ ऋणानुबंध राहिले आहेत. मातंग समाजामधील नेतृत्वाचा लोकनेते नाईक यांनी नेहमीच सन्मान केला आहे. यापुढे देखील मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही संदीप नाईक यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नामवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, फकीरा पॅंथरचे संस्थापक- अध्यक्ष ॲड.गुरु सूर्यवंशी तसेच मातंग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.