यूट्युबर्सची वाशी खाडीपुलावर स्टंटबाजी; पोलिसांकडून शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 02:31 AM2021-03-28T02:31:49+5:302021-03-28T02:32:08+5:30
अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावर यूट्युबर्सकडून जीवघेणे स्टंट केले जात असल्याची बाब समोर आली आहे. यावरून वाशी पोलीस व वाहतूक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान त्यांच्या स्टंटबाजी दरम्यान अपघात घडल्यास पुलावर मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
मुंबईत ठिकठिकाणी बाईकचे स्टंट करणाऱ्या तरुणांचे मोर्चे वाशी खाडीपुलाकडे वळू लागले आहेत. भरधाव वेगात दुचाकी पळवून दोन्ही हात सोडून पायाने हॅन्डल सांभाळत स्टंट केला जात आहे. यावेळी मोबाइल हाताळून स्टंटबाज आपल्या कलेचे दर्शन घडवत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ नुकताच बनवण्यात आलेला आहे. तर स्टंट केल्यानंतर पकडले जाऊ नये याकरिता दुचाकीला नंबरप्लेट वापरलेली नाही. मात्र दोघांचेही चेहरे स्पष्ट दिसत आहेत.
व्हिडीओ हाती लागल्यानंतर वाशी पोलिसांनी स्टंटबाजांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याकरिता वाहतूक पोलिसांमार्फत या जोडीचा शोध घेतला जात आहे. ज्या तरुणाच्या नावे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो स्टंटबाज म्हणून यूट्युबवर ओळखला जातो. त्याचे मुंबई परिसरातले असे अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात रहदारीच्या मार्गावर तो स्टंट करत असल्याचे काही व्हिडीओमध्ये दिसते. तर काही व्हिडिओत घोळके जमून वेगवेगळे स्टंट करत असल्याचे दिसते. अशात त्याने नवी मुंबईत येऊन स्टंट करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा वाशी येथील सागर विहार, जूगाव चौपाटी येथे स्टंट होतात. तेथे मुंबईचे स्टंटबाज येत असतात.
वाशी खाडीपुलावर केले जाणारे स्टंट गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाईची तयारी चालवली आहे. त्याकिरता वाहतूक पोलिसांमार्फत स्टंटबाजने प्रवास केलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. - रमेश चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक