खालापूर : झेनिथ धबधब्यावर वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी मुंबईतून आलेल्या पर्यटकांवर धबधब्याचे दगड पडल्याने एकाच कुटुंबातील दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. झेनिथ धबधबा धोकादायक बनल्याने पोलिसांनी धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असतांना काही अतिउत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धबधब्यावर जात असल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी असलेल्या दोन मुलांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे ईदची सुट्टी असल्याने मुंबईतील खेरवाडी येथे राहणारे दिलीप विजय सिंग कुटुंबासह खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते. शनिवारी ईद असल्याने पोलीस शहरात बंदोबस्त करत होते त्यामुळे धबधब्यावर मात्र बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत काही अतिउत्साही पर्यटक धबधब्यावर गेले होते. धबधब्याचे दोन दगड सुटून खाली आले आणि सिंग कुटुंबावर आदळले यामध्ये अजय सिंग (११) व मंथन सिंग (५) हे दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती हवालदार अजिंक्य गोसावी यांनी दिली. (वार्ताहर)
झेनिथ धबधब्यावर अपघात
By admin | Published: July 20, 2015 2:40 AM