अलिबाग : भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणे, शिक्षकांची नोकरी टिकणे फार कठीण होणार आहे. विद्यार्थी टिकला पाहिजे, या भूमिकेतून शिक्षकांनी काम केल्यास भविष्यात समायोजन करण्याची वेळ येणार नाही. ज्या शाळेची पटसंख्या वाढेल त्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेने सत्कार करावा. आदर्श शिक्षकांबरोबरच चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे, प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अलिबागमधील चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. शिक्षण क्षेत्रात आणि अभ्यासक्रमात झालेल्या फेरबदलामुळे शिक्षकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. डीएड-बीएड कॉलेज बंद करण्याची वेळ येऊ लागली आहे. इंग्रजी शाळांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे यांनी सांगितले.शिक्षणाबरोबरच सामाजिक आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाच्या वेगवेगळ्या विकासासाठी, नवचैतन्यासाठी गुरुजनांनी पुढाकार घेऊन उत्तमरीत्या पाया घडविला पाहिजे. एके काळी मुंबई, पुणे, लातूर पॅटर्नची मक्तेदारी होती; परंतु ही मक्तेदारी मोडीत काढत कोकणचा वेगळा पॅटर्न दहावी व बारावी परीक्षेत राज्यात अव्वल स्थानावर आहे. रायगड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याने त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.प्राथमिक विभागातील १५ आणि माध्यमिक १५ अशा एकूण ३० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. श्रीकांत देशपांडे, जि.प. अध्यक्ष अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आदीसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.