नवी मुंबई : यजमान भारतीय संघाचे १२ महिला फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील चायनिज तैपईविरुद्धचा डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणारा भारताचा सामना काही मिनिटेआधी रद्द करण्यात आला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिल्यानंतर आशियाई फुटबॉल परिषदेनेही माहिती दिली. एएफसीने सांगितले की, ‘कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्याने अ गटातील चायनिज तैपईविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाला आवश्यक १३ खेळाडूंचे नाव देता आले नाही.’
अ गटातील हा महत्त्वाचा सामना रद्द करण्यात आल्यानंतर १२ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची भारतीयांची आशा धूसर झाली आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताला इराणविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले होते. या सामन्याआधीही भारतीय संघातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.