नवी दिल्ली : गेली १३ वर्षे आघाडीची खेळाडू या नात्याने खेळात बरीच प्रगती साधली. सध्या सिनियर खेळाडू म्हणून संघातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना मेंटरच्या भूमिकेचा आनंद लुटत असल्याचे मत भारतीय महिला हॉकी संघाची अनुभवी स्ट्रायकर वंदना कटारिया हिने व्यक्त केले.
२००७ साली भारतीय संघात पदार्पण करणारी वंदना म्हणाली, ‘वयाच्या १५ व्या वर्षी हॉकीचा खेळ सुरू केल्यापासून बेधडक होऊन खेळत आहे. शक्य होईल तितका वेळ चेंडूवर नियंत्रण मिळवून गोल नोंदविण्यासाठी स्वत:च्या कौशल्याचा वापर करीत होते. मात्र वेळेनुसार लक्षात आले की असा खेळ करणे योग्य नाही. या खेळात बदल घडून आला तेव्हा मलादेखील बदलण्याची संधी मिळाली.’संघात युवा खेळाडूंचा भरणा झाल्यानंतर त्यांना मेंटरच्या भूमिकेतून मार्गदर्शन करताना आनंद वाटतो. मैदानावर युवा खेळाडूने कुठल्या परिस्थितीत कसा पवित्रा घ्यावा, याबद्दल सतत मार्गदर्शन करीत असते. मी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करते, मात्र त्यांनी माझ्या गोष्टीवर अंमल करावा, यासाठी बळजबरी करीत नाही. स्वत: काय निर्णय घेऊ शकता, याबद्दल विचार करा, असे मी सहकाऱ्यांना नेहमी सांगत असल्याचे वंदना म्हणाली. लॉकडाऊनमध्ये शारीरिक फिटनेस आणि विरोधी संघाच्या खेळाचे विश्लेषण करण्यात वेळ जात असल्याचे सांगून वंदना म्हणाली, ‘मैदानावर उतरू शकत नसलो तरी आमचे लक्ष मैदानाकडेच लागून असते.’