ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १४ - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खानची निवड झाल्यानंतर त्याच्या उपलब्धतेवरून वाद निर्माण झाला होता. अखेर क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीची निवड करताना क्रिकेट सल्लागार समितीने झहीर खान आणि राहुल द्रविड यांना अनुक्रमे गोलंदाजी आणि फलंदाजीचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.
झहीर खानसोबत वर्षासाठी १५० दिवसांचा करार झाला आहे, असे सौरव गांगुलीने आज इडन गार्डनवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितले. तर बीसीसीआयनेही राहुल द्रविड आणि झहीर खानची निवड ही महत्त्वाच्या दौऱ्यांसाठीच झाली असल्याचे स्पष्ट केले होते.झहीर खान १०० दिवसांहून अधिक वेळ भारतीय संघासाठी देण्यास इच्छुक नव्हता. पण क्रिकेट सल्लागार समितीने त्याला ५० दिवस वाढवून १५० दिवसांचा करार करण्यास राजी केले.अधिक वाचा (सचिन, सौरव आणि लक्ष्मण कोच निवडीच्या लायकीचे नाहीत - संदीप पाटील )
झहीर आणि राहुल द्रविड यांची नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्रीच्या अधिकारांमध्ये मर्यादा आणण्यासाठी या दोघांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू झाली होती. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच सपोर्ट स्टाफच्या निवडीवरुन पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. काल बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी सल्लागार असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मण या त्रिमूर्तीने निवडलेल्या सपोर्ट स्टाफवर प्रशासनिक समितीने (COA) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यामधून आपले हात काढत त्यांची निवड ही परदेश दौऱ्यासाठी असेल असे स्पष्ट केले.