चीनमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे. आजही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत पदकांना गवसणी घातली. आज चौथ्या दिवशी ईशा सिंगने नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत ३४ गुण मिळवले आणि रौप्य पदकावर नाव कोरले. चीनच्या लिऊ रुईने ३८ गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. तर कोरियाच्या जिनला २६ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. खरं तर या पदकासह भारताने नेमबाजीत आतापर्यंत एकूण ११ पदके जिंकली.
सांघिक खेळीच्या जोरावर 'सुवर्ण' कामगिरी ईशा सिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी भारताच्या लेकींनी २५ मीटर सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. मनु भाकर, रिदम सांगवान आणि ईशा सिंग यांनी सांघिक खेळी करत २५ मीटर सांघिक प्रकारात १७२९ चा स्कोर करत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत चीन १७२७ च्या स्कोरसह साथ दुसऱ्या स्थानावर राहिला असून कोरियाला १७१२ स्कोरसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, आशियाई स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. भारताने पहिल्या तीन दिवसांत सुवर्ण पदकांसह १५ पदके जिंकली आहेत. आज चौथ्या दिवशी देखील चीनच्या धरतीवर तिरंगा डौलाने फडकत आहे. भारताने नेमबाजीत आतापर्यंत ११ पदके जिंकली आहेत.