युरोपात बाळसे धरू लागलेल्या दुसऱ्या युरोपियन नेशन्स कप स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनमध्ये झाली. या स्पर्धेत यजमान स्पेनने विजेतेपद मिळवले. सोव्हिएत युनियन उपविजेता ठरला. २९ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा त्या वेळी एकाच देशाच्या यजमानपदाखाली घेण्याची प्रथा नव्हती. होम आणि अवे या प्रकारातून सोव्हिएत युनियन (रशिया), डेनेस, स्पेन आणि हंगेरी हे चार संघ सेमी फायनलमध्ये आले. बार्सिलोना येथे झालेल्या सामन्यात रशियाने डेन्मार्कला ३-० ने हरवून सहजपणे अंतिम फेरी गाठली. माद्रिद येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेन आणि हंगेरी यांची लढत १-१ अशी बरोबरीत चालली होती; परंतु अॅमन्सीओने जादा वेळेत गोल करून स्पेनला अंतिम फेरीत नेले. १९६० च्या उपांत्य फेरीत राजकीय कारणास्तव स्पेनचे सर्वेसर्वा जनरल फ्रँको यांनी स्पेनला रशियात खेळण्यास परवानगी दिली नव्हती. पण नियतीने या दोन्ही संघांना पुढच्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने-सामने आणले. जनरल फ्रँको या वेळी कोणता निर्णय घेणार, याच्याकडे फुटबॉलजगताचे लक्ष लागले होते. पण जनरल फ्रँको यांनी या वेळी जनभावनेचा आदर करीत रशियन संघाला स्पेनमध्ये प्रवेश दिला आणि २१ जून १९६४ रोजी रशिया-स्पेन दरम्यान ऐतिहासिक फायनल रंगली. माद्रिदच्या सॅन्टिगो स्टेडियमवर अंतिम सामना पाहण्यास ७९ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. जे. एम. पेरेडाने सहाव्या मिनिटाला गोल करून स्पेनला आघाडीवर नेले; परंतु पुढच्या दोनच मिनिटांत खुसाईनोव्हने रशियाला बरोबरी साधून दिली. ही बरोबरी पुढे ७६ मिनिटे कायम होती. सामना संपता-संपता ८४ व्या मिनिटाला मार्सेलिनोने गोल डागून स्पेनला चॅम्पियनशिप मिळवून दिली. पहिल्या स्पर्धेत राजकीय अपरिहार्यतेमुळे हात चोळत बसलेल्या स्पेनने रशियाला अंतिम फेरीत हरवून वचपा काढला. हंगेरी तिसऱ्या, तर डेन्मार्क चौथ्या स्थानावर राहिला.
१९६४ स्पेनचे पहिले विजेतेपद
By admin | Published: June 02, 2016 2:06 AM