चौथी युरोपियन चॅम्पियनशीपचे उपांत्य फेरीपासूनचे सामने बेल्जियममध्ये झाले. या स्पर्धेच्या पात्रता फेऱ्यांना १९७0 पासून सुरुवात झाली होती. ३२ संघांचे ८ गटांत वर्गीकरण करण्यात आले होते. या पात्रता फेरीतून बेल्जियम, हंगेरी, रशिया आणि पश्चिम जर्मनी हे चार संघ सेमीफायनलमध्ये आले. त्या वेळेच्या रीवाजानुसार उपांत्य फेरीत आलेल्या देशापैकी एकाला यजमानपदाचा मान देण्यात येत असे, त्यानुसार बेल्जियम यजमान बनला; पण याचा त्याला फायदा झाला नाही. बेल्जियम उपांत्य फेरीत पश्चिम जर्मनीेशी भिडला. हा सामना प. जर्मनीने २-१ असा जिंकल्याने यजमान देशाचा उत्साह कमी झाला. रशियाने हंगेरीला १-0 ने हरवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना अक्षरश: एकतर्फी झाला. पश्चिम जर्मनीने रशियाला ३-0 असे हरवून पहिल्यांदा युरोपची चॅम्पियनशीप मिळवली. चार स्पर्धेत रशियाचा संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता, तर प. जर्मनी पहिल्यांदाच पात्रता फेरीच्या पुढे आला होता. पण, अंतिम सामन्यात जर्मनीपुढे रशियन संघ पुरता निष्प्रभ झाला होता. जर्मनीच्या ग्रेड मुलेरने (२७ आणि ५८ व्या मिनिटाला) दोन गोल केले, तर हर्बर्ट विमरने (५२व्या मिनिटाला) गोल केला. बेल्जियम-प. जर्मनी सामन्याला ५५ हजार प्रेक्षक उपस्थित होते. पण, यजमान देश पराभूत झाल्याने अंतिम सामना पाहण्यास ५0 हजारांची क्षमता असलेल्या ब्रुसेल्सच्या हैसेल स्टेडियमवर ४३ हजार प्रेक्षक उपस्थित होते. सेमीफायनल आणि फायनलमध्ये प्रत्येकी दोन असे चार गोल नोंदवणारा ग्रेड मुलेर हा स्पर्धेचा हीरो ठरला. पाचव्या स्पर्धेचे यजमानपद युगोस्लोव्हियाकडे होते. झेकोस्लोव्हिया, नेदरलँड, पश्चिम जर्मनी आणि यजमान युगोस्लोव्हिया हे स्पर्धेचे अंतिम चार संघ होते. झेकोस्लोव्हियाने नेदरलँडला ३-१ अशा गोलफरकाने हरवून अजिंक्यपदाकडे वाटचाल केली. दुसऱ्या सामन्यात गत चॅम्पियन पश्चिम जर्मनीने युगोस्लोव्हियाला हरवून सलग दुसऱ्या विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे उपांत्य फेरीपासूनचे चारही सामने जादा वेळेपर्यंत खेचले गेले.अंतिम सामनाही त्याला अपवाद नव्हता. निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी झाल्याने पेनल्टी ट्रायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. येथेही दोन्ही संघांचे प्रत्येकी तीन गोल झाल्यानंतर चौथा शॉट खेळण्यास आलेला जर्मनीचा उनी होनेबचा फटका गोलबारला तटून बाहेर गेला. यानंतर झेकोस्लोव्हीयाचा अँथोनिन पानेंका शेवटचा शॉट खेळण्यास आला. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पानेंकाने शांतपणे गोलपोस्टमध्ये चेंडू ढकलला. त्या वेळी गोलकिपरने एका बाजूला डाईव्ह मारला होता. पण पानेंकाने चतुराई केली. झेकोस्लोव्हियाला ५-३ असे अजिंक्यपद मिळवून दिले. त्याचा हा शॉट पानेंका पेनल्टी या नावाने नंतर प्रसिद्धीस आला. आता हा या पेनल्टीला चीप शॉट म्हणून ओळखले जाते. पानेंका पेनल्टीपानेंका पेनल्टीबद्दल पानेंका यांनी सांगितले, की पेनल्टीच्या सरावादरम्यान मी आणि माझा गोलकिपर डेनेक ऱ्हुस्का यामध्ये पैज लागत असे. गोल झाला तर तो मला चॉकलेट किंवा बियर देणार आणि त्याने चेंडू अडवला, तर मी त्याला देणार. पण डेनेक चांगला गोलकिपर असल्याने मी सारखा पैज हरू लागलो. यावर मी गोलकिपरच्या मानसिकतेचा अभ्यास केला. पेनल्टी शॉट मारताना गोलकिपर त्या खेळाडूच्या दिशेचा अंदाज घेत एका बाजूला डाईव्ह मारतात. अशा वेळी मी थोडे सावकाशपणे चेंडू सरळ रेषेत मारला, तर गोलकिपरला अडवता येणार नाही; कारण त्याने आधीच एका बाजूला डाईव्ह मारलेला असतो, हे मी हेरले. सरावादरम्यान याचा वापर केल्याने डेनेकवर मात करून मी पैजा जिंकू लागलो. नेमके हेच तंत्र मी फायनलच्या त्या पेनल्टी शॉटवेळी वापरले.
१९७२ पश्चिम जर्मनी पहिल्यांदा बनला युरोपियन चॅम्प
By admin | Published: June 03, 2016 2:22 AM