मर्यादीत षटकांच्या सामन्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने १९७५ मध्ये इंग्लंड येथे पहिल्या वहिल्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांची लक्षणीय संख्या, आयोजन क्षमता व स्टेडियम या सर्व बाबींचा विचार करुन इंग्लंडमध्ये विश्वचषक आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. ७ ते २१ जून १९७५ या कालावधीत पहिला विश्वचषक रंगला.
पहिल्या विश्वचषकात एकूण ८ संघ सहभागी झाले होते. या विश्वचषकात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड हे सहा कसोटी सामने खेळणारे देश सहभागी होते. याशिवाय पूर्व आफ्रिका व श्रीलंका या देशांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. (हे दोन्ही १९८२ पर्यंत कसोटी क्रिकेटसाठी पात्र ठरले नव्हते.) या विश्वचषकात ६० षटकांचे सामने खेळवण्यात आले होते.
पहिल्या विश्वचषकात आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. विश्वचषकात एकूण १५ सामने पार पडले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज क्लाइव्ह लॉइड यांच्या ८५ चेंडूत १०२ धावांच्या धडाकेबाज खेळीने वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत पहिल्या विश्वचषकावर नाव कोरले. लॉर्ड्स मैदानावर हा अंतिम सामना रंगला होता.
हा खेळ आकड्यांचा
एकूण धावा - ६,१६२
एकूण विकेट्स - २०८
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - ग्लेन टर्नर - न्यूझीलंड ( चार सामन्यांमध्ये ३३३ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - गॅरी गिल्मर - ऑस्ट्रेलिया (२ सामन्यांमध्ये ११ विकेट्स)