विश्वास चरणकर, कोल्हापूरभारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे १९८३ ची विश्वचषक स्पर्धा. कोणाच्या ध्यानी-मनी-स्वप्नी नसतानाही कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दिग्गज वेस्ट इंडीजला पाणी पाजले. भारताचा हा विजय तथाकथित क्रिकेट ‘तज्ज्ञां’च्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरला. भारतीय कर्णधार खऱ्या अर्थाने या स्पर्धचा हिरो होता. त्याने संघाला एका ध्येयाने प्रेरित तर केलेच; शिवाय संपूर्ण स्पर्धेत ज्या-ज्या वेळी संघ अडचणीत आला, त्या मोक्याच्या क्षणी संघाला विजय मिळवून देण्याची कामगिरी केली. --------------९ ते २५ जून, १९८३ या कालावधीत खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या विश्वचषकांत आठ संघ सहभागी झाले होते. पहिल्या दोन स्पर्धांतील विश्वविजेता वेस्ट इंडीज, यजमान इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे संघ यामध्ये सहभागी झाले होते. यांपैकी वेस्ट इंडीज संघ सलग तिसरे विश्वविजेतेपद मिळविणार असेच सर्वांचे म्हणणे होते; पण या सर्वांचे अंदाज भारताने चुकीचे ठरविले. या विश्वचषकाची सुरुवातच नाट्यमयरीत्या झाली. गेल्या विश्वचषकातील शेवटच्या क्रमांकावरील भारत आणि विश्वविजेता वेस्ट इंडीज यांच्यातील लढत म्हणजे गोष्टीतील ससा आणि कासव यांच्यातील शर्यत वाटत होती; पण इथेही कासव जिंंकले. गर्वाने फुगलेल्या विंंडीजला भारताने ३४ धावांनी हरवून धडाक्यात सुरुवात केली. दुसरीकडे, कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या झिम्बाब्वेने आॅस्ट्रेलियाला १३ धावांनी हरविले. या दोन नाट्यमय विजयांनी या विश्वचषकात मोठे उलट फेर घडणार याची ही नांदीच होती. भारताची पुढील मॅच झिम्बाब्वे बरोबर झाली. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला ५ गड्यांनी सहज हरविले. भारताच्या विजयी अभियानाला आॅस्टे्रलियाने ब्रेक लावला. भारताला आॅस्ट्रेलियाकडून तब्बल १६२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुढच्या सामन्यात विंंडीजनेही सलामीच्या लढतीचा बदला घेत भारताला ६६ धावांनी हरविले. झिम्बाब्वेला हरवून भारताची गाडी पुन्हा विजयी मार्गावर आली. पुढच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला ११८ धावांनी हरवून पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. पाचपैकी तीन सामने जिंकून भारत उपांत्यफेरीत पोहोचला. उपांत्यफेरीत भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार कपिलदेवसह सर्व भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत इंग्लंडला २१३ धावांत गुंडाळण्यात यश मिळविले. भारताला ही संधी गमवायची नव्हती. गोलंदाजांनी रचलेल्या पायावर फलंदाजांनी विजयी कळस चढविला. यशपाल शर्माने सर्वाधिक ६१ धावा केल्या. संदीप पाटीलने खरे ‘फायरिंग’ केले. त्याने ३२ चेंडूंत आठ चौकारांसह ५१ धावा कुटल्या. २१४ धावांचे विजयी लक्ष्य भारताने ५४.४ चेंडूंत आरामात पूर्ण केले. उपविश्वविजेत्यांवर सहा गड्यांनी विजय मिळवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला. ४६ धावा आणि दोन बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मोहिंदर अमरनाथ ‘सामनावीर’ ठरला. दुसरीकडे पाकिस्तानला लिलया हरवून वेस्ट इंडीजने फायनल गाठली. स्पर्धेचा अंतिम सामना म्हणजे केवळ एक औपचारिकता, विंंडीज हॅट्ट्रिक करणार, अशा स्वरूपाच्या बातम्यांनी लंडनच्या वर्तमानपत्रांचे रकाने भरले होते. केवळ नशिबानेच भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे, अशी हेटाळणीही केली गेली. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. माल्कम मार्शल, रॉबर्टस, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग अशा जगप्रसिद्ध गोलंदाजांच्या फळीसमोर भारतीय संघ फारशी चमक दाखवू शकला नाही. फक्त के. श्रीकांत (५७ चेंडूंत ३८), संदीप पाटील (२९ चेंडूंत २७) आणि मोहिंंदर अमरनाथ (८० चेंडूंत २६) यांनीच थोडीफार ‘धावाधाव’ केली. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या प्रयत्नामुळे भारताला १८३ पर्यंत मजल मारता आली. भारताकडून फक्त तीन षट्कार ठोकले गेले. पहिला श्रीकांतने, दुसरा संदीप पाटीलने आणि तिसरा मदनलालने. १८३ धावांचे आव्हान विंंडीजसाठी कस्पटासारखे होते. कारण त्यांच्याकडे होती ग्रिनीज, हेन्स, विव्ह रिचर्डस, लॉईड, गोम्स यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांची फळी; पण भारताच्या सुदैवाने त्यादिवशी या सर्वांची प्रतिभा झोपी गेली होती. ग्रिनीज-हेन्स जोडी जमण्यापूर्वी ती संधूने फोडली. संधूचा चेंडू बाहेर जाणार म्हणून ग्रिनीजने सोडला आणि तो झपकन आत आला तो सरळ स्टंपवरच. विंडीज १ बाद ५. यानंतर रिचर्डसने हेन्सच्या मदतीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हेन्स बाद झाला तेव्हा धावसंख्या होती ५०. हेन्सने १३ धावा केल्या; परंतु व्ही. रिचर्डस आपल्या नैसर्गिक तालात खेळत होता. त्याची धावसंख्या चेंडूपेक्षा अधिक असायची आणि हीच भारतीयांची मुख्य चिंंता होती; पण एका बेसावध क्षणी मदनलालला षट्कार ठोकण्याचा मोह विव्हला आवरला नाही. चेंडू त्याच्या हिशेबाने बॅटवर आला नाही आणि उंच उडाला. कपिलने जवळजवळ १८ ते २० यार्ड मागे धावत तो अफलातून झेल पकडला. येथून सामना फिरला आणि विंंडीजचा संघ १४० धावांत गुंडाळला. भक्कम फलंदाजीविरुद्ध दुबळी गोलंदाजी जिंकली होती. वातावरण आणि खेळपट्टीचा योग्य फायदा उठवीत भारतीय गोलंदाजांनी कॅरेबियन खेळाडूंची कशी शिकार केली, हे त्यांना लवकर समजलेच नाही आणि जेव्हा समजले तेव्हा प्रुडेन्शिअल कप कपिलदेवच्या हातात झळकत होता. एक नवा इतिहास साकारला होता. २५ जून १९८३ चा हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला होता.टझिम्बाब्वे विरुद्धचा सामना हा एका अर्थाने ऐतिहासिक ठरला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भारताची अवस्था ५ बाद १७ अशी नाजूक केली असताना कपिलदेवने नाबाद १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. पण, भारतवासियांचे दुर्दैव म्हणजे या दिवशी स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या चॅनेलच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्याने या खेळीचे रेकॉर्डिंग झाले नाही.
१९८३ मध्ये विश्वविजयाचे स्वप्न साकार
By admin | Published: February 14, 2015 11:02 AM