ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - क्रिकेट जगतात आपल्या फिरकीने भलभल्या फलंदाजांना माघारी धाडणा-या हरभजन सिंगने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगने टी - 20 क्रिकेटमध्ये 200 बळींचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आर. अश्विन (200) आणि अमित मिश्रा (208) यांनी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 200 बळींचा पल्ला गाठला आहे. भज्जी सध्या आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून खेळत आहे. काल पुण्याविरोधातील सामन्यात स्मिथला बाद करत त्याने हा पराक्रम केला. या सामन्यात भज्जीने चार षटके गोलंदाजी करताना 20 धावांच्या मोबदल्यात एक बळी मिळवला. या सामन्यात पुण्याने मुंबईचा तिन धावांनी पराभव केला. 104 धावांवर 2 विकेट अशा सुस्थितीत पुणे संघ असताना भज्जीने धोकादायक स्मिथला (17) बाद करत धावांवर अंकुश लावला. 225 व्या सामन्यात भज्जीने 200 बळींचा पल्ला गाठला आहे. असा पराक्रम कराताना भज्जी जगातील 19 वा गोलंदाज ठरला आहे. भारताकडून लेगस्पिनर अमित मिश्राने 176 सामन्यात 208 बळी घेतले आहेत. तर आर. अश्विनने 195 सामन्यात 200 बळींचा पल्ला गाठला आहे. टी - 20 मध्ये सर्वाधिक विकेट वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होने 344 सामन्यात 367 बळी मिळवले आहेत. ब्राव्होनंतर दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आहे.
टी 20 मध्ये भज्जीच्या माथ्यावर 200 विकेटचा मुकुट
By admin | Published: April 25, 2017 5:13 PM