नवी दिल्ली : भारताला २००७ मध्ये पहिल्या टष्ट्वेंटी-२० वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराजसिंगला याच स्पर्धेत ‘सिक्सर किंग’ ही ओळख मिळाली होती आणि हे विजेतेपद त्यानंतर नेहमीसाठी युवीसोबत एका विशेषणाच्या रूपाने जोडले गेले.भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना विजेतेपद पटकावले होते आणि या यशात युवराजची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भारताचा इंग्लंडविरुद्धचा डर्बन येथील सामन्याची आजही आठवण काढली जाते. या सामन्यात युवराजने अवघ्या १६ चेंडूंत ३ चौकार व सात षटकारांसह शानदार ५८ धावांची वादळी खेळी केली होती.युवराजने जादुई फलंदाजी करताना डावाच्या १९ व्या षटकात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सलग सहा षटकार ठोकण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तो टष्ट्वेंटी-२० मध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला आणि एकूण चौथा फलंदाज बनला होता. वेस्ट इंडीजचा गॅरी सोबर्स आणि भारताच्या रवी शास्त्री यांनी हा पराक्रम प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केला होता, तर दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने ही कामगिरी वर्ल्डकपमध्ये केली होती. मनोरंजक बाब म्हणजे टीम इंडियाचे सध्याचे संचालक रवी शास्त्री त्या षटकाच्या वेळी समालोचन करीत होते. युवराजच्या या कामगिरीमुळेच त्याला ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखण्यात येऊ लागले होते. युवराजचा त्या सामन्यातील प्रत्येक षटकार हा गगनचुंबी होता आणि स्टेडियमच्या सीमारेषेच्या खूप दूरवर त्याने षटकार ठोकले होते. (वृत्तसंस्था)
युवराज बनला होता २००७ मध्ये ‘सिक्सर किंग’
By admin | Published: March 14, 2016 12:58 AM