आफ्रिकेची वारी केल्यावर आयपीएलचे तिसरे पर्व पुन्हा भारतात रंगले. पहिला सामना १० मे २०१० रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. पहिल्याच सामन्यात तब्बल ४०० हून अधिक धावा केल्या गेल्या. मुंबई इंडियन्सने २० षटकांत २१२ धावांचा डोंगर रचला. तर राजस्थान रॉयल्सनेही चोख प्रत्युत्तर दिले. पण अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी पराभव झाला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या चेन्नईने तिस-या पर्वात सातत्त्यपूर्ण खेळी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तिस-या सिझनमध्ये आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सामना टाय झाला. किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना टाय झाल्याने सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागला. पंजाबने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपरकिंग्जवर विजय मिळवला.
अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज हे संघ आमने सामने होते. सुरेश रैनाच्या ३५ धावांमध्ये ५७ धावांच्या खेळीने चेन्नईने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ सचिन तेंडुलकरने ४८ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. मात्र अन्य फलंदाजांनी अपेक्षीत साथ न दिल्याने मुंबई इंडियन्सचा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत आणखी एका सुवर्ण कामगिरीची नोंद झाली.