४ एप्रिल २०१३ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्याने आयपीएलच्या सहाव्या पर्वाची सुरुवात झाली. ख्रिस गेलच्या झंझावाती फलंदाजीने पहिल्याच सामन्यात चार चांद लावले. गेलने ५८ चेड़ूंमध्ये ९२ धावा चोपल्या. पण आयपीएलचे सहावे पर्व अखेरच्या टप्प्यात आले असताना स्पर्धेला स्पॉट फिक्सिंग व बेटिंगचे गालबोट लागले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे हे शेवटचे आयपीएल असल्याने मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी आपल्या लाडक्या खेळाडूला गोड निरोप दिला.
सहाव्या पर्वातही नऊ संघ होते. तर डेक्कन चार्जर्सची नाव हेदराबाद सन रायडर्स असे करण्यात आले. मुंबईच्या क्रिकेट परंपरेला जपत मुंबई इंडियन्सने स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली. अंतिम सामन्यात मुंबईसमोर आव्हान होते ते महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी गमावत १४८ धावा केल्या. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या बलाढ्य फलंदाजीला रोखून संघाला २३ धावांनी विजय मिळवून दिला.