ललित झांबरे : आंतरराष्ट्रीय टेनिस जगतासाठी सर्वात महत्त्वाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या हिशेबाने आणखी एक वर्ष सरले असले तरी येणारे वर्ष अतिशय मनोरंजक आणि भारी उत्सुकतेचे ठरणार आहे. ते कसे काय? तर आता महिला टेनिस पाठोपाठ पुरुषांच्या टेनिसमध्येही सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदे कोण पटकावणार याची स्पर्धा रंगणार आहे कारण सेरेना विल्यम्स यंदासुध्दा मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करु शकली नाही आणि इकडे रॉजर फेडररसुध्दा आपल्या 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांमध्ये भर टाकू शकला नाही. मात्र राफेल नदाल यंदा फ्रेंच ओपन व यूएस ओपन जिंकून त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय.म्हणून 2020 मध्ये सेरेना एखादी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करेल का? 19 ग्रँडस्लॅम विजेतेपदे नावावर असणारा राफेल नदाल आणखी एक-दोन स्पर्धा जिंकून फेडररला मागे टाकणार का? की फेडरर एखादी स्पर्धा जिंकून आपल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची आघाडी आणखी वाढवेल, याची उत्सुकता आहे. म्हणून 2020 हे टेनिससाठी मनोरंजक वर्ष ठरणार आहे.फेडरर हा 2018 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकू शकलेला नाही. त्यानंतरच्या सात पैकी चार ग्रँडस्लॅमअजिंक्यपदे नोव्हाक जोकोवीचच्या नावावर लागली आहेत तर तीन अजिंक्यपदे राफेल नदालच्या नावावर लागली. त्यामुळेच पुरुष एकेरीतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांच्या स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे.याचप्रमाणे महिला एकेरीतही सेरेना विल्यम्स जानेवारी 2017 च्या ऑस्ट्रेलियन ओपन अजिंक्यपदापासून 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदांवरच अडकून पडली आहे. त्यानंतर सात ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळताना ती चार वेळा अंतिम फेरीतही पोहोचली पण प्रत्येकवेळी विजेतेपदाने तिला हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे 2020 मध्ये तरी सेरेना ही अपयशाची मालिका मोडेल काय याची उत्सुकता आहे.2020 साठी टेनिसबाबत आणखी एक उत्सुकतेचा विषय म्हणजे ऑलिम्पिक सामने. रॉजर फेडररने टेनिस जगतातील जवळपास प्रत्येक स्पर्धा जिंकली आहे पण ऑलिम्पिक सुवर्ण पदक अद्याप त्याला जिंकता आलेले नाही. ते जिंकून फेडरर आपले शोकेस 2020 मध्ये पूर्ण करणार का, याचीसुध्दा उत्सुकता असेल.
टेनिससाठी 2020 असेल उत्सुकतेचे वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:35 PM
महिला एकेरीपाठोपाठ पुरुष एकेरीतही विक्रमांची संधी
ठळक मुद्देसेरेना वारंवार हुलकावणी देणारा विक्रम गाठणार का?फेडरर आपली आघाडी वाढवणार का?नदाल विजेतेपदांबाबत फेडररला गाठणार का?