2024 Women's FIH Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिला संघाचे पॅरिस ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले. रांची येथे झालेल्या २०२४ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची संधी गमावली. जपानविरुद्धच्या आजच्या लढतीत भारतीला १-० अशी हार मानावी लागली. भारतीय महिलांनी अखेरच्या मिनिटापर्यंत गोल करण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, परंतु नशीबाने त्यांची साथ नाही दिली.
पात्रता स्पर्धेतील अव्वल तीन संघ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार होते आणि घरच्या मैदानावरील या स्पर्धेत भारतीय संघाला आपले नाणे खणखणीत वाजवण्याची संधी होती. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जर्मनीविरुद्ध यजमान संघाने कडवी टक्कर दिली, परंतु सडन डेथमध्ये हार झाली. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या आजच्या लढतीत जपानचे आव्हान मोडण्याचा निर्धार भारतीय महिला खेळाडूंनी केला होता. पण, सहाव्या मिनिटाला जपानच्या उराता काना हिने गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानने अभेद्य बचाव उभा करून सामना शेवटच्या क्वार्टरपर्यंत नेला.
भारतीय खेळाडूंकडून जोरदार प्रयत्न होताना दिसले, परंतु जपानचा बचाव वरचढ ठरला. चौथ्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला भारतीय महिलांनी बरोबरीचा गोल जवळपास केलाच होता, परंतु जपानच्या गोलरक्षकाने तितकाच सुरेख बचाव केला. पण, भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि तो यजमानांनी गमावला. भारतीय संघाचे पेनल्टी क्षेत्रातील आक्रमण प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणार होता. ७व्या मिनिटाला जपानची गोलरक्षक अकियो तनाकाने अविश्वसनीय बचाव केला. भारताने निर्माण केलेली ही सामन्यातील ही सर्वात अप्रतिम संधी होती. भारतीय संघाला सलग ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि तनाका तितक्याच ताकदीने उभी होती. भारतीय संघाला शेवटी हार मानावी लागली.
उपांत्य फेरीत जर्मनीला झुंजवलेभारतीय महिला हॉकी संघाने २०२४ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत गुरुवारी जर्मनीला टफ फाईट दिली होती. उपांत्य फेरीची ही लढत जिंकून भारताला २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित करता आला असता. पण, कडवी टक्कर देऊनही भारतीय संघाला हार मानावी लागली. दीपिकाने १५व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिल्यानंतर स्टॅपेनहोर्स्टच्या ( २७ व ५७ मि.) गोलच्या जोरावर जर्मनीने पुनरागमन केले, परंतु इशिकाने ५९व्या मिनिटाला गोल करून सामना २-२ असा बरोबरीत रोखला. पेनल्टी शूटआऊटमध्येही ३-३ अशी बरोबरी झाल्याने सडन डेथवर निकाल लावला. जर्मनीच्या नॉल्टेने गोल केला, परंतु सोनिकाला अपयश आले अन् भारताला २-२ ( ४-३) अशी हार मानावी लागली.
भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास.... १९८० मध्ये भारतीय महिला संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळळा होता आणि तेव्हा ते चौथ्या स्थानावर समाधानी राहिले होते. त्यानंतर ऑलिम्पिक खेळण्यासाठी २०१६ साल उजाडले. ब्राझिलमध्ये झालेल्या स्पर्धेत महिला संघ १२ व्या क्रमांकावर राहिला होता. २०२० टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते, परंतु त्यांच्या खेळाची सर्वांनी प्रशंसा केली होती.