ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. २० - रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये 'रौप्य' पदक पटकावत इतिहास रचणा-या पी.व्ही.सिंधूमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र हे यश मिळवण्यासाठी सिंधूने प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेक आवडत्या गोष्टींचाही त्याग केला. सिंधूने तिचे आवडते पदार्थ हैदराबादी बिर्याणीचा त्याग केला तसेच आजच्या काळातील प्रत्येकाची मूलभूत गरज असलेल्या मोबाईलला सिंधूने तीन महिने हातही लावला नाही.
आणखी वाचा :
पी. गोपीचंद हे अतिशय कडक शिस्तीचे प्रशिक्षक असून ऑलिम्पिकसाठी तयारी करणा-या सिंधूने त्यांच्या निगराणीखाली अथक मेहनत घेत सराव केला. सर्वोत्तम गोष्ट साध्य करायची असेल तर जीवनातील लहानसहान आनंदांचा त्याग केला पाहिजे, हे गोपीचंद यांचे सूत्र असून त्यांनी गेल्या काही महिन्यांत कडक शिस्तीत सिंधूकडून सराव करून घेतला .
एकाग्रता भंग करणाऱ्या तसेच मानसिक स्थिती बिघडवू शकणाऱ्या समाजमाध्यमांना सिंधूने स्वत:हून दीड महिना रामराम ठोकला. मात्र, काल रौप्य पदक जिंकल्यानंतर पी. गोपीचंद यांनी सिंधूला हवे तितके आईस्क्रीमही खाण्याची सूट दिली असून तिचा मोबाईल परत करणार असल्याचे सांगितले. रिओत दाखल झाल्यापासून मी तिच्या गोड खाण्यावर विशेषत: आईस्क्रीम खाण्यावर बंदी घातली होती. मात्र, आता सिंधू तिला हवे ते खाऊ शकणार आहे, असे गोपीचंद यांनी नमूद केले.
कसे झाले सिंधूचे प्रशिक्षण
- ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सिंधूला तिची आवडती चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणी खाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. तसेच देवाचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरही बंदी घालण्यात आली.
- उत्तेजकांसंदर्भातील कठोर नियमांमुळे सिंधूला बाहेरचं पाणी पिण्यासदेखील मज्जाव करण्यात आला होता.
- सिंधूला एकटीने जेवण्यास परवानगी नव्हती, पी. गोपीचंद यांच्याबरोबरच भोजन घेणं अनिवार्य होते, खाद्यपदार्थातून काहीही दिले जाऊ शकते या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली.
- उंच उडी मारून प्रतिस्पध्र्याच्या दिशेने शरीरवेधी स्मॅश मारण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूचा खास सराव करून घेतला. सिंधूची उंची जास्त असल्याने प्रतिस्पर्धी तिला फटक्यांसाठी खाली वाकायला भाग पाडण्याची रणनीती आखतात. हे लक्षात घेऊन प्रदीर्घ रॅली आणि उंचीवरचे फटके खेळण्यावर भर राहील अशी रणनीती गोपीचंद यांनी आखली.
- तासाभरापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या लढतींसाठी सक्षम राहण्यासाठी गेले वर्षभर व्यायामशाळेत वजन उचलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
- रिओमध्ये खेळणा-या तरूणासोबत गोपीचंद यांनी स्वत: सराव केला. त्यासाठी त्यांनी गेल्या ८ महिन्यांपासून स्वत:च्या आहारात बदल करत वजन कमी केलं. तसेच त्यांनी त्यांच्या अकदामीमध्ये साखर व पावावर बंदी घालण्यात आली आहे.