rafael nadal news : टेनिस विश्वावर राज्य करणारा २२ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तो या हंगामानंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होईल. ३८ वर्षीय टेनिस आयकॉन नोव्हेंबरमध्ये मलागा येथे होणाऱ्या डेव्हिस कप फायनलमध्ये स्पेनसाठी खेळताना दिसेल. नदालने गुरुवारी जारी केलेल्या एका व्हिडीओ संदेशाद्वारे ही माहिती शेअर केली. या जीवनात प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतो. मला असे वाटते की, माझ्या कल्पनेपेक्षा मोठी आणि खूप यशस्वी कारकीर्द संपवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे नदालने नमूद केले. तसेच माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी माझी शेवटची स्पर्धा डेव्हिस चषकाची अंतिम फेरी असेल याबद्दल मी खूप उत्सुक आहे, असेही त्याने नमूद केले.
राफेल नदाल पुढे म्हणाला की, मी आता व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत आहे. मागील काही वर्षे माझ्यासाठी कठीण होती, विशेषत: गेली दोन वर्षे... स्पेनचा राफेल नदाल हा महान टेनिसपटूंपैकी एक आहे. राफेलला वयाच्या १४ व्या वर्षीच रॅकेट देण्यात आले होते. वयाच्या आठव्या वर्षीच त्याने टेनिसविश्वात पदार्पण केले. तो आठ वर्षांचा असताना त्याने १२ वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावले होते.
दरम्यान, राफेल नदालने त्याच्या कारकिर्दीत तब्बल २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया साधली. वयाच्या १२व्या वर्षांपर्यंत तो टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळत असे. पण, पुढे जाऊन याच पोराने टेनिस जगताला आपलेसे केले. त्याचे काका टोनी नदाल यांच्या सल्ल्यानुसार तो या क्षेत्रात आला अन् इतिहास घडला.