रांची : जीवनाशी संघर्ष करून झारखंडमधील (Jharkhand) मुलींनी फुटबॉलमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. देश-विदेशातील फुटबॉल (Football) मैदानावर चमकणाऱ्या या मुलींची कहाणी फारच वेदनादायक आहे. काहींना त्यांच्या गरीब-अशिक्षित वडिलांनी २५ हजार रूपयांना विकले, तर काही वीटभट्टीवर काम करत फुटबॉल खेळत राहिल्या. काहींना जेवणाच्या नावाखाली फक्त मीठ आणि तांदूळ मिळायचे, तर काही मुलींच्या आई आजही इतरांच्या घरातील धुणी-भांडी धुवून आपले घर चालवतात. काहींच्या नशिबी अद्याव अनवाणी धावणे सुरूच आहे, तर काहींनी शॉर्ट्स घातल्यानंतर गावकऱ्यांच्या वाईट नजरा सहन करूनही फुटबॉलची आवड स्वतःमध्ये जिवंत ठेवली.
वयाच्या १२ व्या वर्षी प्रियांकाची झाली होती विक्रीप्रियांकाचा जन्म रांचीमधील कानके येथील हलदामा या छोट्याश्या गावात अत्यंत गरीब कुटुंबात झाला. जिथे दोन वेळचे जेवण देखील मिळणे कठीण होते. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी राजस्थानमधील एका मुलासोबत तिचे लग्न लावून देण्यासाठी तिच्या पालकांनी दलालाच्या बहाण्याने २५ हजार रुपयांचा सौदा केला होता.काही लोकांना ही बाब वेळीच समजली आणि प्रियांका विकण्यापासून वाचली. पुढे ती फुटबॉलच्या मैदानात जाऊ लागली. विशेष म्हणजे आता प्रियांका इंग्लंड, डेन्मार्कसह अनेक देशांमध्ये देखील फुटबॉल खेळत आहे.
छोटे पदार्थ विकून आईने अंशूला वाढवलेप्रियांकासह झारखंडमधील आणखी आठ मुलींचा संघात समावेश होता. ओरमांझी ब्लॉकच्या इरबा पहान टोली येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय अंशू कछापने २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीयमहिला फुटबॉल संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. अंशूला वडील नाहीत त्यामुळे घरची सर्व जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. अंशूच्या आईने तांदळापासून बनणारे छोटे पदार्थ विकून तिचे पालनपोषण केले. अंशू म्हणते की तिची आई पहाटे चार वाजता उठते. अंशू भांडी घासते, झाडू काढते, उरलेले अन्न खाते आणि फुटबॉल खेळण्यासाठी आणि जवळपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी चार किलोमीटर दूर जाते.
वीटभट्टीवर काम करणारी नीता बनली स्टारनीतू लिंडा ही रांचीच्या कानके येथील हलदाम गावची रहिवासी आहे. तिने अंडर-१८ आणि अंडर-१९ मध्ये भारतीयमहिला फुटबॉल संघात सहभाग घेतला होता. नीतूबद्दल तिची मोठी बहीण मीतू लिंडा सांगते की, ती सकाळी लवकर उठून घरातील सर्वांसाठी जेवण करते. कधी कधी ती शेतात, तर कधी वीटभट्टीवर देखील कामाला जायची.
मीठ आणि भात खाऊन अनिताने घेतली गरूडझेपअनिता कुमारीची मागील एप्रिलमध्ये भारतीय महिला फुटबॉलच्या १७ वर्षाखालील नॅशनल कॅम्पमध्ये निवड झाली होती. रांची मधील चारी हुचीर गावात राहणारी अनिताची आई सांगते की त्यांना एकूण ५ मुली आहेत. पती दारू पित असल्यामुळे कुटुंबावर त्यांचे लक्ष नसायचे म्हणून त्या एकट्या पडल्या होत्या. त्यामुळे कुटुंब चालवण्याची जबाबदारी अनिताच्या आईच्या खांद्यावर होती. अनिताच्या आईने मजूरी करून पाच मुलींना भात, पाणी आणि मीठ देऊन वाढवले.
माओवादी भागातून सुधाचा संघर्षयंदाच्या १७ वर्षाखालील नॅशनल कॅम्पमध्ये निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सुधा अंकिता तिर्की हिचाही समावेश आहे. ती गुमला येथील माओवादी भाग असलेल्या चैनपूर येथील दानापूर गावातील रहिवासी आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही तिच्या कुटुंबाने त्यांच्या मुलीला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. नॅशनल कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सुधाचे संपूर्ण कुटुंब मातीच्या घरात राहते आणि त्यांच्या घरात साधा टीव्हीही नाही.
शॉर्ट्स घातल्यावर ऐकावे लागायचे टोमणे रांची जिल्ह्यातील ओरमांझी येथे राहणाऱ्या सीमा कुमारीला फुटबॉलने हार्वर्ड विद्यापीठापर्यंत नेले. फुटबॉल खेळताना शॉर्ट्स घातल्याबद्दलही तिची खिल्ली उडवली गेली, पण तिने त्याची पर्वा न करता आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला. उच्च शिक्षणासाठी गेल्या वर्षी तिची हार्वर्ड विद्यापीठात पूर्ण शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी निवड झाली होती. सीमाचे आई-वडील अशिक्षित असून ते शेती आणि सूत कारखान्यात काम करून आपले घर चालवतात.