मँचेस्टर : सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास टाळाटाळ करीत असलेल्या इंग्लंड संघातील खेळाडूंना ईसीबीचे संचालक तसेच माजी कर्णधार अॅण्ड्र्यू स्ट्रॉस यांनी विचार करण्यास तीन दिवसांची मुदत दिली आहे.जो खेळाडू दौऱ्यातून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेल, त्याला संघातील स्वत:चे स्थान गमवावे लागू शकते, असा इशारादेखील स्ट्रॉस यांनी दिला.कर्णधार अॅलिस्टर कूक याच्यासह अष्टपैलू मोईन अली आणि ख्रिस जॉर्डन यांनी मात्र बांगलादेशात जाण्यास आधीच होकार कळविला. मर्यादित षटकांच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा इयोन मॉर्गन याने अद्यापही स्वत:चे मत दिलेले नाही. मॉर्गनने पाकविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यादरम्यान प्रतिक्रिया देताना कर्णधार या नात्याने आपण बांगलादेश दौऱ्यावर संघासोबत जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. पण, खेळात सहजपणा नसेल तर क्रिकेटवर लक्ष केंद्रित होणार नाही. त्याआधी ज्या देशात खेळायचे आहे, तेथील वातावरण शांत असल्याची खात्री करून घ्यावी लागेल, असेही मॉर्गनने म्हटले. स्ट्रॉस म्हणाले, ‘‘खेळाडूंना दौरा करणे आणि बाहेर राहणे याचे फायदे तसेच तोटेही आहेत. कुणी जाणार नसेल तर स्पष्ट आहे, की दुसऱ्यांना संधी मिळेल. तुमच्या जागी अन्य खेळणार असेल, तर तुमचे नुकसान आहे. तुमचे स्थान घेणारा खेळाडू चमकला, तर पुन्हा तुम्हाला संघात स्थान मिळेलच, याची खात्री नाही.’’(वृत्तसंस्था)