नवी दिल्ली : पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ला आजपासून सुरूवात होत आहे. यजमान भारतीय संघाचा सलामीचा सामना स्पेनशी होणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. खरं तर भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, मेन इन ब्ल्यूने या स्पर्धेत मागील 48 वर्षांपासून एकही किताब जिंकला नाही. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून किताब जिंकण्याची अपेक्षा आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
दरम्यान, हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेला पाकिस्तानचा संघ यंदाचा विश्वचषक खेळणार नाही. खरं तर पाकिस्तानच्या संघाने 4 वेळा विश्वचषकाचा किताब पटकावला आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात शेजाऱ्यांना अपयश आले. यंदाच्या विश्वचषकाच्या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत, परंतु भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी झाला नाही.
पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानकडे सर्वाधिक चार जेतेपदे आहेत. असे असूनही पाकिस्तान यंदाच्या विश्वचषकात स्थान मिळवू शकला नाही. मेगा इव्हेंटमध्ये पाकिस्तानची अनुपस्थिती सीमेच्या दोन्ही बाजूंच्या हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. कारण भारत आणि पाकिस्तानने सात दशकांहून अधिक काळ एकमेकांविरुद्ध अनेक प्रतिष्ठित सामने खेळले आहेत. हॉकी विश्वचषक 2023 मध्ये जागा मिळवण्यासाठी पाकिस्तानला 2022 आशिया चषकातील पहिल्या चारमध्ये स्थान मिळणे आवश्यक होते. मात्र, ते दुसरी फेरी गाठण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे ते 2023 हॉकी विश्वचषकाचा भाग होऊ शकले नाहीत. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तान हॉकी वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2014 च्या विश्वचषकातही शेजाऱ्यांना विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
पहिल्या दिवशी होणार 4 सामनेस्पर्धेतील पहिला सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. दुसरीकडे दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पूल-अ च्या फ्रान्सशी भिडणार आहे. त्यानंतरचा सामना 21000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियमवर इंग्लंड आणि वेल्स यांच्यात होईल. नंतर दिवसातील शेवटचा सामना भारत आणि स्पेन यांच्यात होईल. कलिंगा स्टेडियमवर या स्पर्धेतील 24 सामने आणि बिरसा मुंडा स्टेडियमवर 20 सामने खेळवले जाणार आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
- गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश
- बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप
- मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग
- फॉरवर्ड्स - मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग
- पर्यायी खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"