मुंबई : जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे ‘मुंबई मॅरेथॉन’ हे समीकरण ठरलेलेच. त्यासाठी केवळ मुंबईकरच नव्हे, तर भारतीयांसह जगातील अव्वल धावपटू आतुरतेने वाट पाहतात. यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीत १२व्या वर्षात पदार्पण करणारी ही मॅरेथॉन १८ जानेवारीला होत आहे. या ग्लोबल स्पर्धेसाठी गेले दोन महिने कसून सराव करणाऱ्यांना आपापल्या क्षमतेची चाचपणी करण्याची संधी त्यानिमित्ताने मिळेल. हवामानातील बदलांमुळे मुंबईचा गारवा वाढला आहे आणि अशा पोषक वातावणात यंदा अनेक विक्रम होण्याची आशा आयोजकांकडून व्यक्त होत आहे. या स्पर्धेत यंदा ४०,४८५ धावपटूंनी सहभाग घेतला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून पहाटे ५:३० वाजता हौशी धावपटूंच्या शर्यतीला सुरुवात होणार असून, पूर्ण मॅरेथॉनचे बिगुल ७ वाजता वाजणार आहे. आंतरराष्ट्रीय धावपटूंना टक्कर देण्यासाठी या वेळी भारतीय धावपटूही सज्ज झाले आहेत. शर्यत सीएसटीपासून राजीव गांधी सागरी सेतूवरून पुन्हा सीएसटी येथे संपेल. ४२ किलोमीटरच्या या शर्यतीत गतवर्षी पुरुष गटात युगांडाच्या जॅक्सन किप्रोप याने २ तास ०९ मिनिटे व ३२ सेकंदांची नोंद करून, तर महिला गटात केनियाच्या वॅलेंटाइन किपकेटर हिने २ तास २४ मिनिटे व ३३ सेकंदांची नोंद करून कोर्स विक्रमाची नोंद केली होती. हा विक्रम यंदा मोडेल असा विश्वास मुंबई मॅरेथॉनचे प्रमुख ह्युज जोन्स यांनीही व्यक्त केला आहे. ते म्हणाले, या वर्षीचे वातावरण थंड आणि अॅथलिट्सना सर्वोत्तम कामगिरीस पोषक आहे. त्यामुळे गतवर्षी झालेले विक्रम यंदा मोडू शकतात. भारतीय एलिट गटात गतविजेती ललिता बाबर हिनेही आपल्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्धार बोलून दाखविला. गतवर्षी जेतेपद पटकावताना तिने २ तास ५० मिनिटे व ३१ सेकंदांची नोंद करीत बाजी मारली होती. यंदा मात्र त्यात सुधारणा करून २ तास ४४ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, २२ ते ३० आॅगस्ट या कालावधीत बीजिंगमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता मिळविण्यासाठी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची आहे. आशियाई स्पर्धेनंतर मुंबई मॅरेथॉनसाठी दोन महिने कसून सराव केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
उद्या धावणार ४० हजार स्पर्धक!
By admin | Published: January 17, 2015 3:08 AM