नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर कालपासून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात (WFI) ऑलिम्पियन खेळाडू आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून अद्याप भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली की, "प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे." लक्षणीय बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, पैलवान बजरंग पुनिया याने सरकारला इशारा देत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याने आज एक मोठे विधान करताना म्हटले, "जर आम्ही आमच्या देशासाठी लढू शकतो तर आम्ही आमच्या हक्कांसाठी देखील लढू शकतो." अशा शब्दांत ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिल्लीच्या जंतरमंतरवरून इशारा दिला आहे. तसेच चॅम्पियन कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावली. सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. आंदोलकांचे प्रश्न आज सुटावेत यासाठी मी प्रयत्न करेन, असा विश्वास बबिता फोगाट यांनी आंदोलक खेळाडूंना दिला.
महिला पैलवानांवर अत्याचार केल्याचा पुरावा आहे - पुनिया भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाने गंभीर आरोप केले आहेत. "आमच्यासोबत 5-6 महिला कुस्तीपटू आहेत ज्यांनी या अत्याचारांचा सामना केला आहे आणि आमच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी पुरावे देखील आहेत", असा इशारा ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिला आहे. तसेच आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारकडून आम्हाला कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. ब्रिजभूषण सिंग राजीनामा देतील आणि तुरुंगात जातील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही नक्कीच गुन्हा दाखल करू, असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सांगितले.
विनेश फोगाटचे गंभीर आरोप विनेश फोगाटने गंभीर आरोप करताना म्हटवे, "ते (युनियन) आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि आमचा छळ करतात. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. जंतरमंतरच्या कुस्तीपटूंना हे सांगायचे आहे तेव्हापासून आम्ही आमचा आवाज उठवला आहे, पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत."
आंदोलन करावे लागते ही मजबुरी - फोगाट "आमची मजबुरी आहे की इथे येऊन ठिय्या मांडावा लागतो. आम्ही आपापसात चर्चा केली, त्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेतला, आम्हाला दु:ख होत असताना ही योजना आखली गेली. सर्व पैलवानांना त्रास होत आहे", असे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अधिक सांगितले. भारतीय कुस्ती महासंघाचे अधिकारी आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे बजरंग पुनियाने सांगितले. त्यांना कोणाच्या समस्या आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, फेडरेशन आमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"