श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर, ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९९ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा दि. १७ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत '५० वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर' छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, येथे आयोजित करण्यात आले आहे. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ९५ वर्षे या वयोगटातील सुमारे २००० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होतील.
संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतील. शिबीरचे शुल्क रू २००/- आणि वास्तू निधी रू २००/- एकूण रू ४००/- शुल्क भरावे लागेल. शिबिराच्या प्रत्येक सत्रानंतर सर्व शिबिरार्थींना व प्रशिक्षकांना संस्थेतर्फे पौष्टिक खुराक दिला जाईल. शिबिराच्या रोजच्या ध्वजारोहण व ध्वजावतरण समारंभासाठी समाजातील नामवंत मान्यवरांना पाचारण केले जाते व त्यांच्या कार्याचा परिचय शिबिरार्थींना करून दिला जातो.
या शिबिराचा उद्घाटन समारंभ, बुधवार, दि. १७.४.२०२४ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळात होणार आहे. या प्रसंगी समर्थची देशा-विदेशात गाजलेली मल्लखांब प्रात्यक्षिकेही सादर करण्यात येतील. सुमारे २००० शिबिरार्थी, त्यांचे २००० पालक व सुमारे १०० खास निमंत्रित असा भव्य क्रीडाप्रेमी समुदाय त्यावेळेस उपस्थित असेल. शिबीर प्रवेश दि. १ एप्रिल, २०२४ पासून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत समर्थ क्रीडा भवन येथे सुरु करण्यात येतील, ५ वर्षावरील सर्वांसाठी प्रवेश उपलब्ध आहे.