ग्लास्गो : येथे सुरू असलेल्या २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या विकास गौडा याने अॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुलमध्ये अॅथलेटिक्स प्रकारात एका पुरुषाने मिळवलेले हे सुवर्ण ५६ वर्षांनंतर भारताच्या नावावर नोंद झाले. ३१ वर्षीय या खेळाडूने ६३.६३ मीटर अशी थाळी फेकत सुवर्ण मिळवले. ६६.२८ मीटर अशी त्याची याआधीची सर्वाेत्तम कामगिरी होती. सायप्रसच्या अॅपोस्टोलोस पारेलिसने रौप्यपदक मिळवले. त्याने ६३.३२ मीटर तर कांस्यपदक विजेत्या जमैकाच्या जेसन मोर्गनने ६२.३४ मीटर अशी कामगिरी केली. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलियाच्या बेन हराडीने याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानाव लागले. दरम्यान, विकास गौडाने भारताची ५६ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. याआधी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये महान धावपटू मिल्खा सिंग यांनी सुवर्णपदक मिळवले होते. १९५८ मध्ये कार्डिफ येथे ४४० यार्ड्स पुरुषांच्या शर्यतीत त्यांनी ही कामगिरी केली होती.विकास गौडाने २०१० मध्ये रौप्यपदक जिंकले होते. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याने सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन केले होते. यंदाच्या सत्रातील ६५.६२ अशी त्याची सर्वाेत्कृष्ट कामगिरी होती. (वृत्तसंस्था)
५६ साल बाद !
By admin | Published: August 02, 2014 12:02 AM