मिरपूर : बांगलादेशाविरुद्ध गुरुवारी झालेल्या पहिल्या वन डेत यजमान संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला कथित धक्का दिल्या प्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर सामना शुल्कातील ७५ टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला. आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत लेव्हल दोनच्या गुन्ह्यात धोनी दोषी आढळला. ही घटना काल भारतीय डावात घडली. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीच्या मार्गात मुस्तफिजूर येताच क्रिझ गाठण्याच्या नादात धोनीने त्याला धक्का दिला. मॅच रेफ्री अॅण्डी पायक्रॉफ्ट यांनी कालच भारतीय संघाचे व्यवस्थापक विश्वरूप डे यांना पाचारण केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : धोनीने हेतुपुरस्सरपणे गोलंदाजाला धक्का दिला नसल्याने कर्णधार या प्रकरणात दोषी नसल्याचा निर्णय संघव्यवस्थापनाने घेतला. भारताने या निर्णयावर विरोध दर्शविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय व्यवस्थापकाने त्याबाबत अर्ज दाखल केला.खेळाडूंचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये मैदानी पंच रॉड टकर आणि इनामूल हक यांना पायक्रॉफ्ट यांनी बोलाविले होते. नंतर धोनी, डे आणि संचालक रवी शास्त्री यांना बोलाविण्यात आले. टीम इंडियाने केलेल्या युक्तिवादानुसार धोनीने कधीही ढोपराने मारले नाही. तो केवळ धाव घेऊ इच्छित होता. रिप्लेनुसार धोनीचा खांदा आणि ढोपर यात काहीही अंतर नव्हते. यावरून त्याने गोलंदाजाला ढोपराने मारण्याचा प्रयत्न केला नाही हे सिद्ध होते. अशा प्रकारचा शारीरिक संपर्क लेव्हल एकचा गुन्हा ठरू शकत नाही. मॅच रेफ्रीने हा लेव्हल दोनचा गुन्हा ठरविला. भारतीय त्रिकुटाची सुनावणी पार पडल्यानंतर बांगलादेशाचे व्यवस्थापक खालिद महमूद सुजोन यांची सुनावणी झाली. एका दैनिकाशी बोलताना मुस्तफिजूर म्हणाला, ‘‘मी मध्ये येऊन चूक केली होती.’ त्याआधी रोहित शर्माच्या फलंदाजीच्यावेळीही मुस्तफिजूर मध्ये आला होता. त्याच्यावर सामना शुल्कातील रकमेच्या ५० टक्के रकमेचा दंड आकारण्यात आला आहे. मैदानावर टक्कर ही सामान्य बाब!- सामन्यादरम्यान मैदानावर खेळाडूंची टक्कर होणे ही सामान्य बाब असून, हे प्रकरण अधिक ताणले जाऊ नये असे मत भारत आणि बांगलादेशच्या कर्णधारांनी व्यक्त केले. काल धोनी आणि प्रतिस्पर्धी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर यांच्यात टक्कर झाली होती. २५ व्या षटकांत धोनी एक धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना मुस्तफिजूर आडवा आला होता. रहमानच्या पायाला लागताच तो मैदानाबाहेर गेला. नासिर हुसेन याने नंतर हे षटक पूर्ण केले होते.- धोनी म्हणाला, ‘गोलंदाजाला वाटले की मी बाजूला होईल. मला वाटले की गोलंदाज बाजूला होईल. पण दोघेही एकाच रांगेत आल्यामुळे टक्कर झाली. हे कुठल्याही सामन्यात घडू शकते. मी नंतर गोलंदाजाशी चर्चा केली.’ प्रतिस्पर्धी कर्णधार मूर्तझाने देखील अशाप्रकारच्या घटना सहज होतात, असे स्पष्ट केले.बांगलादेशाचा वेगवान मारा अप्रतिमबांगलादेशचा वेगवान मारा अप्रतिम होता, तसेच चेंडूतील विविधता वाखाणण्याजोगी होती. पराभवाचे दु:ख झाले; पण बांगलादेश आमच्या तुलनेत सरस खेळला, त्यामुळे विजयी संघाचे अभिनंदन करायला हवे. मंद खेळपट्टीवर चेंडू एकदम अंगावर येतो. बांगलादेशच्या गोलंदाजांनी याचा पुरेपूर लाभ घेत चेंडूत विविधता आणली. दोन्ही संघांच्या वेगवान माऱ्यात हाच फरक जाणवला.- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार भारत.
धोनीला ७५% रकमेचा दंड
By admin | Published: June 19, 2015 11:35 PM