वॉशिंग्टन : बेसबॉल आणि बास्केटबॉलवेड्या अमेरिकेमध्ये आता तब्बल ८ अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमची उभारणी होणार आहे. विशेष म्हणजे, एका भारतीय - अमेरिकन क्रिकेटचाहत्या व्यावसायिकाने या स्टेडियमच्या उभारणीची घोषणा केली आहे. यासाठी तब्बल २.४ अब्ज डॉलर खर्च येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.भारतीय वंशाचे व्यावसायिक जिग्नेश पंड्या यांनी या आठ प्रस्तावित स्टेडियमच्या उभारणीची घोषणा करताना सांगितले की, ‘हे स्टेडियम न्यूयॉर्क, न्यू जर्सी, वॉशिंग्टन डीसी, जॉर्जिया, फ्लोरिडा, टेक्सास, इलिनॉइस आणि कॅलिफोर्निया येथे उभारण्यात येतील. प्रत्येक स्टेडियममध्ये सुमारे २६ हजार प्रेक्षकक्षमता ठेवण्यात येणार असून, या माध्यमातून अमेरिकेत सुमारे १७ हजार ८०० नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील.’ गुजरातमध्ये जन्मलेले पंड्या हे अमेरिकेमध्ये रिअल स्टेट डेव्हलपर म्हणून काम करतात. तसेच, क्रिकेट सामने पाहण्यासाठी २ मुलांसह जगभर प्रवास करीत असतात. ांड्या यांनी पुढे सांगितले की, ‘अमेरिकेमध्ये लीगच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट सुरू करण्याचे आपले लक्ष्य आहे. यामुळे येथील क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळेल. त्याच वेळी क्रिकेट चाहत्यांनाही जागतिक स्तराच्या सुविधांमध्ये खेळाचा आनंद घेता येईल.’ (वृत्तसंस्था)
अमेरिकेत उभारणार ८ क्रिकेट स्टेडियम
By admin | Published: February 03, 2017 4:55 AM