Rashid Anwar । नवी दिल्ली : भारतासह जगभर सध्या राष्ट्रकुल स्पर्धेची चर्चा रंगली आहे. खरं तर या राष्ट्रकुल स्पर्धेची (Commonwealth Games) सुरूवात १९३० मध्ये झाली होती, मात्र तेव्हा भारताला यामध्ये सहभागी होत आले नव्हते. भारताला या बहुचर्चित स्पर्धेत सहभागी होण्याची संधी १९३४ मध्ये मिळाली. तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांना 'ब्रिटिश एम्पायर गेम्स' म्हणून ओळखले जात होते. लंडनमध्ये पार पडलेल्या या ब्रिटिश एम्पायर गेम्समध्ये भारताने ॲथलेटिक्स आणि कुस्तीमध्ये ६ खेळाडूंचा गट पाठवला होता. या ६ खेळाडूंमधीलच एक नाव म्हणजे राशिद अनवर (Rashid Anwar)होते, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताच्या विजयाचे खाते उघडले. राशिद यांनी तेव्हा कांस्य पदक जिंकून भारताला पहिले पदक मिळवून दिले होते.
राशिद अनवर यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला होता. विशेष म्हणजे ते रेल्वेमध्ये नोकरी करत असताना त्यांची पोस्टिंग उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाली होती. या नोकरीसोबतच ते कुस्तीचे डावपेच शिकत गेले. माहितीनुसार, ते कुस्तीतील वेल्टरवेट श्रेणीमध्ये ८ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिले होते. १९३४ मध्ये जेव्हा त्यांना एवढ्या मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
१९४० मध्येही होते पदकाचे प्रबळ दावेदार राशिद अनवर यांनी १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र या ऑलिम्पिकमधील दुसऱ्या राउंडमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि ते बाहेर झाले. १९४० च्या ऑलिम्पिकसाठी अनवर यांनी जोरदार तयारी केली होती मात्र दुसऱ्या युद्धाच्या कारणास्तव ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. या ऑलिम्पिकमध्ये राशिद यांना पदकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण १९४० च्या ऑलिम्पिक आधी त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चॅम्पियन पैलवान अल फुलर आणि बिली रिले यांना चितपट केले होते. त्यांच्या कुस्तीतील एका डावाला तर 'स्विंगिंग बोस्टन क्रॅब' असे नाव देण्यात आले होते.
संघर्षमय प्रवास दुसऱ्या विश्व युद्धामुळे राशिद आणि कुस्ती यामधील अंतर वाढू लागले होते. कारण युद्धामुळे मोठ्या कालावधीपर्यंत स्पर्धांचे आयोजन होत नव्हते. अशा परिस्थितीत युद्धाच्या काळात राशिद यांनी रूग्णवाहिकेवर चालक म्हणून देखील काम केले. १९५७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात पाय ठेवला आणि १९५९ मध्ये एका प्रसिद्ध सामन्यात चॅम्पियन हान्स स्ट्रीगरचा पराभव केला. यानंतर वाढत्या वयामुळे त्यांची कुस्तीवरील पकड हळूहळू ढासळत गेली. अखेर १९७३ मध्ये या संघर्षमय योद्ध्याची प्राणज्योत मावळली, तेव्हा ते लंडनमधील कॅमडेन येथे राहत होते.