मुंबई: बॉलमध्ये घुंगरू .... घुंगराच्या दिशेने धावणारे खेळाडू... आपल्या सवंगड्याच्या आवाजाच्या दिशेने आलेल्या आवाजाचा अंदाज घेत केलेला पास... आणि मग केलेला गोल.... आणि झालेला जल्लोष... हे वातावरण पवई येथील अंध फुटबॉल सामन्यात पाहिल्यानंतर एखादे सरावलेले फुटबॉलपटू खेळ खेळात आहेत, असेच सर्वांना वाटेल. परंतु जर हाच खेळ अंध खेळाडू खेळत असतील तर कोणालाच खरे वाटणार नाही.
पवईत नुकतेच संपन्न झालेल्या महिलांचा अंध फुटबॉल प्रदर्शनी स्पर्धेच्या सामन्यात इंडिया अ टीम ने इंडिया बी टीमला जोरदार धक्का दिला. नेत्रदीपक खेळ करत 1-0 ने विजय मिळविला. विशेष म्हणजे कोची येथे होणाऱ्या फुटबॉल सामन्यात हीच टीम जपान सोबत भिडणार आहे. यात पुरुषांच्या 10 आणि महिल्यांच्या 2 टीम भाग घेणार आहेत.
पवईतील महानगरपालिकेच्या मैदानात दि राईट शॉट तर्फे आयोजित महिलांचा अंध फुटबॉल प्रदर्शनी स्पर्धेचे उद्घाटन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. टीआरएसचे संचालक अल्विन रॉड्रिग्ज आणि ऑपरेशन प्रमुख संतोष हीतने यांनी सामन्याचे आयोजन केले होते..यावेळी कोच विक्रम आणि ऋषीकेश यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया अ टीम तर्फे केरेन (तमिळनाडू), दीपाली कांबळे (महाराष्ट्र), दीपाली पवार (महाराष्ट्र), कोमल गायकवाड (महाराष्ट्र), पद्मिनी तुडू (ओडिशा), शाहिस्ता बेगम ( कर्नाटक), सविता वाडीले ( महाराष्ट्र) ने 1-0 ने विजय मिळविला. तर कोच डियो आणि रशद यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया ब टीम तर्फे आर सी विजयलक्ष्मी (तमिळनाडू), भाग्यश्री रुग्गी (महाराष्ट्र), नीरमा ठाकरदा (गुजरात), मनसा (कर्नाटक), कंचन पटेल ( मध्यप्रदेश), आशा चौधरी (गुजरात) यांनी भाग घेतला होता.
सहकाऱ्याचा आवाज लक्षात ठेवणे महत्त्वाचे बॉलमध्ये घुंगरू टाकून त्या आवाजाच्या दिशेने खेळाडू पळत असतात. आपल्या टीममधील सहकाऱ्यांच्या आवाजावर संपूर्ण खेळ आधारित असतो. यात प्रत्येक खेळाडने सातत्याने 'वाय' शब्द उच्चारायचा असतो.
30 मिनटे चाललेल्या या सामन्यात गोल कोण करणार आणि बाजी कोण मारेल, ही उत्सुकता सर्वांना होती. सरते शेवटी दीपाली कांबळे या महिला खेळाडूंनी अफलातून गोल मारत टीमला विजय मिळवून दिला. यावेळी अनिल गलगली जसविंदर सिंगबिंदर, राज किरण सिंह, दिनेश देवाडिगा, रवि वर्मा, मधुकर इंगळे, रुचिरा इंगळे, रियाझ मुल्ला उपस्थित होते.