मुंबई : भारतात वेगवेगळ्या लीग होत आहेत आणि यातून नवनवीन युवा चेहरे समोर येत आहेत. आयपीएल, प्रो कबड्डी, टेबल टेनिस लीग, टेनिस लीग, बुद्धीबळ लीग अशा लीगमध्ये भारतीय संघांना फ्युचर स्टार मिळत आहेत. या लीग्सच्या यादीत आणखी एक लीग दाखल झाली आहे आणि त्यात शिलाँगची कन्या प्रतिस्पर्धींना चांगलाच इंगा दाखवताना दिसत आहे. चेहऱ्यावर निरागसता दिसणाऱ्या २३ वर्षीय बंदरिका खारकोंगोरने पंजा लीगमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मेघालयातील शिलाँग येथील बंदरिका मुंबईस्थित फ्रँचायझी मुंबई मसलसाठी पंजा लीगच्या पहिल्या पर्वात खेळतेय. ती तिच्या तीन बहिणी आणि आईसोबत राहते. तिने सेंट एडमंड कॉलेज, शिलाँगमधून बॅचलर ऑफ सोशल वर्कमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आता फॅशनमध्ये डिप्लोमा करत आहे. शिलाँगमध्ये ती अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात लढा देणारी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. लहानपणापासून बंदरिकाला खेळाची आवड होती, पण आपण आर्म रेसलर होऊ असे तिला कधीच वाटले नव्हते.
''एकदा कॉलेजमध्ये आर्म रेसलिंग स्पर्धेत सहभाग घेतला अन् मी महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जिंकली आणि नंतर आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांसाठी माझी निवड झाली. त्या वेळी जे रेफरी आमच्या कॉलेजला भेट देत असत, त्यांनी मला सांगितले की, जर मला आर्म रेसलिंग हा खेळ म्हणून निवडायचा असेल तर मी त्याचं गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे आणि कठोर परिश्रम केले पाहिजे, मग यश मिळू शकेल,” ती पुढे म्हणाली. बंदरीकाने तिच्या यशाचे श्रेय आईला दिले. तिच्या संपूर्ण प्रवासात आईने तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. पूर्वोत्तर प्रदेशातून त्रिदीप मेधी, चेतना शर्मा आणि रिबासुक लिंगडोह मावफ्लांग हेही खेळाडू या खेळात नाव गाजवत आहेत. पंजा लीगमध्ये भाग घेतल्यानंतर, बंदरिका आगामी जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे, जी २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान अल्माटी, कझाकस्तान येथे होणार आहे.