ऑनलाइ लोकमत
जोहान्सबर्ग, दि. १८ - वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलयर्सने एकदिवसीय सामन्यातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विश्वविक्रम रचला आहे. डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत शतक ठोकण्याची किमया साधली असून डिव्हिलियर्सच्या तडाखेबाज खेळीने आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध ४३९ धावांचे डोंगर रचले आहे.
जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु आहे. या सामन्यात आफ्रिकेच्या तडाखेबाजा फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. हाशीम आमला आणि रिसी रोसो या सलामीवीरांना दमदार शतक ठोकून संघाला मजबूत स्थितीत आणले. रोसो बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या एबी डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. डिव्हिलियर्सने १६ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर ३१ चेंडूत शतक ठोकून त्याने विश्वविक्रमच रचला. यापूर्वी इंग्लंडच्या कोरे अँडरसनने ३६ धावात शतक ठोकले होते. विशेष म्हणजे अँडरसननेही वेस्ट इंडिजविरुद्धच वेगवान शतक ठोकले होते. डिव्हिलियर्सने ४४ चेंडूत १४९ धावा केल्या. यामध्ये नऊ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश आहे.