बंगळुरू : सामना हातातून जवळजवळ निसटलेला असताना धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स व इक्बाल अब्दुल्ला यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने निर्णायक पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात लायन्सला ४ विकेटनी नमवून आयपीएलच्या नवव्या मोसमाची अंतिम फेरी गाठली. ६ बाद ६८ अशी केविलवाणी अवस्था असताना एबीने ४७ चेंडंूत नाबाद ७९ धावांचा तडाखा दिला. तर, अब्दुल्लाने २५ चेंडूंत नाबाद ३३ धावांची फटकेबाजी केली. या दोघांच्या धडाक्यापुढे धवल कुलकर्णीचा (४/१४) भेदक मारा झाकोळला गेला.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बँगलोरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना गुजरातला २० षटकांत १५८ धावांवर रोखले. एकूणच स्पर्धेतील बँगलोरच्या फलंदाजांनी लावलेला धडाका पाहता, त्यांचा दणदणीत विजय गृहीत धरला जात होता. मात्र, कर्णधार विराट कोहली (०), विध्वंसक ख्रिस गेल (९), लोकेश राहुल (०), शेन वॉटसन (१) व सचिन बेबी (०) झटपट परतल्याने बँगलोरचा डाव सहाव्या षटकात ५ बाद २९ असा घसरला.या वेळी एका बाजूने टिकलेल्या एबीने स्टुअर्ट बिन्नीसह ३९ धावांची भागीदारी केली. बिन्नी (२१) बाद झाल्यानंतर बँगलोरवर पुन्हा दडपण आले; परंतु त्यानंतर आलेल्या अब्दुल्लाने अखेरपर्यंत एबीला साथ देऊन संघाला थरारक विजय मिळवून दिला. या दोघांनी ९१ धावांची नाबाद भागीदारी करून गुजरातला नमवले. एबीने ४७ चेंडंूत प्रत्येकी ५ चौकार व षटकार ठोकले. तर, अब्दुल्लाने २५ चेंडंूत ३ चौकार व एक षटकार मारला. धवलने १४ धावांत ४ प्रमुख फलंदाज बाद करून बँगलोरच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. मात्र, एबी-अब्दुल्ला यांनी गुजरातच्या हातातील सामना हिसकावून घेतला. बँगलोरने १८.२ षटकांत ६ बाद १५९ धावा करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. तत्पूर्वी, ३ बाद ९ धावा अशी अवस्था झालेल्या गुजरातला ड्वेन स्मिथने तडाखेबंद अर्धशतक झळाकवून समाधानकारक मजल मारून दिली. स्मिथने ४१ चेंडंूत ५ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी करून ७३ धावा फटकावल्या. दिनेश कार्तिकने ३० चेंडंूत २६ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. वॉटसनने (४/२९) अचूक मारा केला. तर, अब्दुल्लाने सुरुवातीला अॅरोन फिंच व ब्रँडन मॅक्युलम यांना बाद करून गुजरातची फलंदाजी उद्ध्वस्त केली होती. संक्षिप्त धावफलक : गुजरात लायन्स : २० षटकांत सर्व बाद १५८ धावा (ड्वेन स्मिथ ७३, दिनेश कार्तिक २६; शेन वॉटसन ४/२९, इक्बाल अब्दुल्ला २/३८) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : १८.२ षटकांत ६ बाद १५९ धावा (एबी डिव्हिलीयर्स नाबाद ७९, इक्बाल अब्दुल्ला नाबाद ३३; धवल कुलकर्णी ४/१४, रवींद्र जडेजा २/२१).
एबी सैराट, तर आरसीबी झिंगाट
By admin | Published: May 25, 2016 3:10 AM