नवी दिल्ली : न्यूजर्सी (अमेरिका) येथील भारतीय वंशाचा १२ वर्षांचा बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा याने बुधवारी ऐतिहासिक कामगिरीसह सर्वांत युवा ग्रॅन्डमास्टर बनण्याचा मान संपादन केला. बुडापेस्ट येथील स्पर्धेत अभिमन्यूने तिसरा जीएम नॉर्म जिंकला. त्याआधी त्याने आवश्यक २५०० ईएलओ रेटिंगही गाठली होती. कारकीर्दीत सर्वांत मोठा सामना जिंकताना अभिमन्यूने भारताचा १५ वर्षांचा ग्रॅन्डमास्टर लियॉन ल्यूक मेंडोनका याच्यावर काळ्या मोहऱ्यांसह मात केली. नवव्या फेरीअखेर अभिमन्यूने २६०० पेक्षा अधिक गुणांची कमाई केली.
१९ वर्षे जुना विक्रम मोडीत
n अभिमन्यूने १९ वर्षांआधी ग्रॅन्डमास्टर सरेयी कजाकिन याने नोंदविलेला विक्रम मोडीत काढला. कजाकिन याने १२ ऑगस्ट २००२ ला १२ वर्षे सात महिन्यांच्या वयात हा विक्रम केला होता.
n अभिमन्यूचा जन्म ५ फेब्रुवारी २००९ ला झाला. सर्वोच्च किताब जिंकण्यासाठी त्याने १२ वर्षे, चार महिने आणि २५ दिवसांचा वेळ घेतला.
n अभिमन्यू मिश्राने हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात वास्तव्य करीत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. याचा त्याला लाभ झाला.