भारताचा दिग्गज नेमबाज अभिनव ब्रिंदा यानं आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या नीरज चोप्रा याची भेट घेतली. बिंद्रानं नीरजला एक गोंडस गिफ्ट देखील दिलं. नीरजला गुडलक म्हणून अभिनव बिंद्रानं एक श्वानाचं पिल्लू गिफ्ट म्हणून दिलंय. विशेष म्हणजे या पिल्लाचं नाव 'टोकियो' असं आहे. अभिनव बिंद्रानं त्याच्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. इतकंच नव्हे, तर २०२४ साली पॅरिस ऑलिम्पिकनंतर 'टोकियो'ला त्याचा भाऊ 'पॅरिस' नावं पिल्लू भेट म्हणून देईन असंही अभिनवनं म्हटलं आहे.
"भारताचा गोल्डन मॅन नीरज चोप्राची आज भेट घेऊन अतिशय आनंद झाला. 'टोकियो' तुझ्यासाठी नक्कीच एक उत्तम मित्र ठरेल आणि २०२४ साली 'पॅरिस' नावाचा त्याचा भाऊ तुला भेट म्हणून मिळवून देण्यासाठी तुला 'टोकियो' प्रोत्साहन देईल अशी आशा आहे", असं ट्विट अभिनव बिंद्रानं केलं आहे.
बिंद्रानं दिलेल्या या 'अभिनव' गिफ्टसाठी सोशल मीडियात अभिवन बिंद्राचं कौतुक केलं जात आहे. अतिशय गोंडस आणि सुरेख गिफ्ट असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यानं भालाफेकीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.