वॉकलॉ : अभिषेक वर्मा याने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट देताना आर्चेरी (निशाणेबाजी) वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे एकदिवस आधी सांघिक कास्यपदकासाठी झालेल्या लढतीत अपयशी ठरलेल्या अभिषेकने वैयक्तिक प्रकारामध्ये सगळी कसर भरून काढताना भारतासाठी सुवर्ण जिंकले.जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानी असलेल्या अभिषेकने अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करताना इराणच्या इस्माईल इबादीला १४८-१४५ झुंजाररीत्या नमवले. या विजयासह अभिषेकने गतवर्षी आशियाई स्पर्धेत झालेल्या इस्माईलविरुद्ध झालेल्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपादेखील काढला. पूर्णपणे वर्चस्व राखलेल्या या सामन्यात अभिषेकने एकूण १३ वेळा अचूक १० गुणांचा वेध घेतला. यामुळे इस्माईलवरील दबाव आणखी वाढत गेला. या सामन्यात धमाकेदार सुरुवात करताना इस्माईलने पहिल्या गेममध्ये नोंदवलेल्या २८ गुणांना जोरदार उत्तर देताना ३० गुणांचा वेध घेतला. येथूनच घेतलेली आघाडी त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवली. यानंतर त्याने दोन वेळा १० गुणांचा वेध घेताना एकदा नऊ गुण घेत तीन गुणांनी आघाडी घेतली.तसेच इस्माईलनेदेखील या वेळी कडवी झुंज देताना अभिषेकला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र अचूक नेमबाजीचा धडाका लावलेल्या अभिषेकपुढे त्याचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. इंचिओन आशियाई स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात अभिषेकला इस्माईलविरुद्ध १४१-१४५ असा पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)
अभिषेकने दिली भारतीयांना सुवर्णभेट
By admin | Published: August 16, 2015 10:40 PM