नवी दिल्ली : भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात धरमशाला येथे सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीसह आधीच्या तिन्ही आयोजन स्थळांना निधी मंजूर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय प्रशासकीय समितीला (सीओए) दिले आहेत.न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि झारखंड या राज्य क्रिकेट संघटनांसह हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला आयोजनाचे पारिश्रमिक देण्याची सूचना केली. काही राज्य संघटनांनी ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी निधी हवा असल्याच्या मागणीकडे पीठाचे लक्ष वेधले आहे. यावर सीओए आणि आयपीएल फ्रन्चायसी यांनी परस्पर समन्वय साधून आयपीएलचे आयोजन सुकर होण्यासाठी पावले उचलावीत असे कोर्टाने बजावले. चौथ्या कसोटीसाठी सीओएने एचपीसीएला अद्याप २.५ कोटीची रक्कम दिली नसल्याचे एचपीसीएकडून हजर असलेले अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी पीठाच्या निदर्शनास आणून दिले. लोढा समितीच्या शिफारशीनुसार सामना आयोजन करणाऱ्या राज्य संघटनेला ही रक्कम देणे अनिवार्य असल्याचे मेहता यांचे म्हणणे होते. सीओएचे वकील पराग त्रिपाठी यांनी आधीच्या परंपरेनुसार सामना संपल्यानंतर खर्चाचा तपशील सादर करताच निधी देण्यात येत होता, अशी माहिती दिली. (वृत्तसंस्था)
कसोटी मालिकेसाठी निधी मंजूर करा - सुप्रीम कोर्ट
By admin | Published: March 24, 2017 11:45 PM