नवी दिल्ली : बीसीसीआयमधील वादावर कायदेशीर मत मागविण्यासाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी जे शपथपत्र सादर केले, त्यात खोटी तसेच अवास्तव माहिती दिल्याचा आरोप करून आयसीसीचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.बीसीसीआय कार्य समितीच्या बैठकीत श्रीनिवासन यांना सहभागी करायचे अथवा नाही याबद्दल निर्देश द्यावेत, या आशयाचे शपथपत्र बीसीसीआयतर्फे ११ सप्टेंबर रोजी ठाकूर यांनी सादर केले होते. ठाकूर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात श्रीनिवासन हे अद्याप इंडिया सिमेंटचे ट्रस्टी असल्याने त्यांची दुहेरी भूमिका कायम असल्याचे तसेच दुसरीकडे श्रीनिवासन हे चेन्नईतील चार्टर्ड अकाउंटंट फर्मचे भागीदार असल्याचेही म्हटले होते. तथापि, श्रीनिवासन यांनी याचिकेत ‘बीसीसीआयकडे माझा सर्व रेकॉर्ड उपलब्ध असताना ठाकूर यांनी ‘राईचा पर्वत’ करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्या’चा आरोप केला. यावर श्रीनिवासन यांनी २००८मध्ये घटनादुरुस्ती झाली त्या वेळी ठाकूर हे स्वत: तसेच सध्याचे पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी हेदेखील बैठकीला हजर होते, याकडे लक्ष वेधले आहे.ठाकूर यांनी कोलकाता येथे २८ आॅगस्ट रोजी झालेल्या बीसीसीआय कार्य समितीच्या बैठकीत श्रीनिवासन हे बळजबरीने शिरले असा दावा शपथपत्रात केला; पण श्रीनिवासन यांनी ठाकूर यांचा दावा खोटारडा असल्याचे म्हटले असून, आपल्या समर्थनार्थ बीसीसीआय कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, उपाध्यक्ष टी. सी. मॅथ्यू आणि केरळ क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांचेही शपथपत्र जोडले आहे. या तिघांनी बैठक सुरू झाली, तेव्हा श्रीनिवासन हे बसले होते आणि त्यांच्या उपस्थितीवर कुणीही आक्षेप घेतला नसल्याचे म्हटले आहे.ठाकूर यांनी खोटे पुरावे सादर केले असून, त्यांच्या वैयक्तिक अर्जाला त्यांनी बीसीसीआयद्वारे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोपही श्रीनिवासन यांनी याचिकेत केला आहे. श्रीनिवासन यांनी दाखल केलेल्या याचिकेतील आरोप सिद्ध झाल्यास दोषीला भादंविच्या १९३ आणि २०९ कलमानुसार किमान ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. (वृत्तसंस्था)
खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप
By admin | Published: September 30, 2015 11:48 PM