नवी दिल्ली : 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून भारतीयांना जिम्नॅस्टीक्स खेळाकडे आकर्षित करणाऱ्या दीपा कर्माकरच्या 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दीपाला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे मत तिचे प्रशिक्षक बिश्वेस्वर नंदी यांनी सांगितले. त्यामुळे तिचा ऑलिम्पिक सहभान निश्चित मानला जात नाही.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपानं प्रोदूनोव्हा वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला होता. 14.833 गुणांसह ऑलिम्पिक स्पर्धेच्या वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली होती. अंतिम फेरीत तिनं 15.066 गुणांची नोंद करत चौथे स्थान पटकावले, अवघ्या काही गुणांच्या फरकानं तिचं कांस्यपदक हुकलं होतं.
त्यानंतर 2017साली दुखापतीनं तिला ग्रासलं. 2017च्या आशियाई आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिनं जुलै 2018मध्ये टर्की येथे झालेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुनरागमन केले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. याच स्पर्धेच्या बॅलेंस बिम प्रकारात तिनं अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
2018च्या आशियाई स्पर्धेची पात्रता मिळवण्यात दीपा अपयशी ठऱली. तिनं डाव्या गुडघ्याला दुखापत करून घेतली आणि त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रीयाही झाली. त्यानंतर ती स्पर्धेबाहेरच आहे आणि आता 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागावरही साशंकता व्यक्त केली जात आहे.