गुडगाव : आॅलिम्पियन अदिती अशोक हिने आपला सर्वोत्तम खेळ करत रविवारी डीएलएफ गोल्फ अॅण्ड कंट्री क्बलमध्ये हिरो महिला इंडियन ओपनचा किताब पटकावला. रियो आॅलिम्पिक स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केलेल्या अदिती हिने तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत पार ७२ चे कार्ड खेळले आणि त्यासोबतच तिने इंडियन ओपनचा किताब पटकावला.अदितीचा स्कोअर ५४ होलनंतर तीन अंडर २१३ असा होता. या विजयाने तिला ६० हजार डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती पहिल्या स्थानी पोहोचली आहे.अदितीने अखेरच्या फेरीत आपली आघाडी कमी-जास्त होत असताना रोमांचक स्थितीत शॉटवर नियंत्रण ठेवले. तिला अमेरिकेची ब्रिटनी लिसीकोम आणि स्पेनच्या बेलेन मोजो यांचे आव्हान मिळाले होते. ब्रिटनी आणि बेलेन दोन अंडर २१४ च्या स्कोअरसह संयुक्त दुसऱ्या स्थानी आहेत.या विजयाने अदिती वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी पोहचेल. ती म्हणाली, ‘या वर्षात मला कतार आणि दुबईत आणखी दोन स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यातही चांगला खेळ करावा लागेल. त्यामुळे मी अग्रस्थानी पोहोचेल.’अदितीने अखेरच्या फेरीत दोन शॉटच्या आघाडीसह उतरली. तिने फ्रंट नऊ पार खेळला. आणि ती महिला युरोपियन टूरच्या पहिल्या फेरीत आघाडीवर राहिली. मात्र, ब्रिटनीने दबाव बनवला आणि अपला स्कोअर एकूण दोन अंडर २१४ वर संपवला. अखेरच्या फेरीतील दोन होल शिल्लक असताना अदिती अणि बेलेन यांनी १७ व्या होलमध्ये बोगी केली. ब्रिटनीच्या बरोबरीत त्या पोहोचल्या आणि १८ व्या होलमध्ये बेलेन हिने पार खेळला. तर अदितीने अविश्वसनीय शॉट मारत बर्डी खेळली आणि विजेतेपद पटकावले. थायलंडच्या कानफानितनेन मुआंगखुमसाकुल हिने चौथे स्थान तर इंग्लंडच्या फ्लोरेंटिना पार्कर हिने पाचवे स्थान पटकावले. वाणी कपूर हिने २८ वे स्थान राखले. तर दीक्षा डागर हिने २२९ च्या स्कोअरसह स्पर्धेतील सर्वोत्तम अमॅच्युअर खेळाडूचा किताब पटकावला.(वृत्तसंस्था)
अदिती अशोकने रचला इतिहास
By admin | Published: November 14, 2016 1:54 AM