- स्वदेश घाणेकररस्ता दुर्घटनेत त्याने पाय गमावला... क्रीडा क्षेत्रात ऐन भरात असताना झालेल्या या अपघातामुळे कोणीही खचला असता... जगण्याची उमेद गमावून बसला असता, परंतु तसे झाले नाही... पाय गमावून मिळालेल्या आयुष्याच्या शिकवणीचे त्याने जतन केले... ते केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न राखता त्याच्यासारख्या इतरांमध्ये ते वाटले... त्यांच्यासोबत त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारतात खेळाडू घडविण्याचे स्वप्न पाहिले... ते स्वप्न २०२२ च्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सत्यात उतरणार आहे.. भारताचा पॅरा सायकलपटू आदित्य मेहता यांचा हा संघर्ष...
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या पॅरा सायकलपटू आदित्य यांना पाय गमावल्यानंतर जगण्याचा खरा अर्थ समजला. त्यामुळे अपंगत्वामुळे खचलेल्या अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले, खेळाच्या माध्यमातून त्यांना एक लक्ष्य दिले आणि ते गाठण्याची प्रेरणाही... या उद्देशाचा भाग म्हणून आदित्य हे प्रत्येक वर्षी इंफिनिटी राईड स्पर्धेचे आयोजन करतात. त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक खेळाडू विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाला पदक मिळवून देत आहेत.
२०२० ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत पायाने अपंग असलेल्या १०० व्यक्तीना खेळाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणायचे लक्ष्य आदित्य यांनी ठेवले आहे. या खेळाडूंमधून २०२० च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यारे खेळाडू त्यांना घडवायचे आहे. हे सर्व कार्य साकारण्यासाठी त्यांनी. आदित्य मेहता फाऊंडेशनची स्थापना केलेली आहे. याबाबत भारतीय पॅरा सायकलिंग संघाचे प्रशिक्षक आदित्य म्हणाले ," मागील दोन वर्षांत मी १३० अपंग खेळाडूंना विविध खेळाचे मार्गदर्शन दिले. हे खेळाडू आज विविध आंतरराष्ट्रीय पॅरा स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि पदकही जिंकत आहेत. याचा अभिमान वाटतो."
BSF चे जवान हरिंदर सिंग यांना भूसुरुंग स्फोटात आपले पाय गमवावे लागले होते. मात्र या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी खेळाद्वारे जगण्याची जिद्द कमावली. असे अनेक BSF जवानही या फाऊंडेशनचा भाग आहेत.