आकाश नेवे / आॅनलाइन लोकमत :कोलकाता, दि. 14 - शनिवारचा दिवस हा आयपीएलच्या या सत्रातील दोन सर्वोत्तम सामन्यांचा दिवस होता. सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर विजय मिळवत आपले प्ले आॅफमधील स्थान पक्के केले, तर मुंबईनेही केकेआरवर विजय मिळवत आपले अव्वल स्थान कायम राखले. २० गुणांसह मुंबई हा क्वालिफायरमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. या विजयात चमकला तो अंबाती रायडू. त्याने ३७ चेंडूत ६३ धावा करत मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. अखेरीस हीच बाब मुंबईला विजय मिळवून देणारी ठरली.अंबाती रायडू याचा या स्पर्धेतील दुसराच सामना होता, तर त्याची खंबीर साथ देणाऱ्या सौरभ तिवारीचा या सत्रातला पहिलाच सामना होता. मुंबईने या सामन्यात संघात बरेच बदल केले होते. पार्थिव पटेल, लसीथ मलिंगा, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्लेघन, हरभजन सिंह यांना बाहेर बसवले.फलंदाजीत केलेले बदल संघाच्या पथ्यावर पडले. मात्र, त्याचसोबत गोलंदाजी केलेले बदल संघाला काही प्रमाणात महागात पडले. मात्र, मुंबईनेच विजय मिळवल्याने याची फारशी चर्चा होणार नाही. बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूची फलंदाजी या सामन्यात इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा नक्कीच सरस होती. त्याने खणखणीत चौकार आणि षटकारलगावले. मात्र, त्याच्या एका चुकीमुळे सौरभ तिवारी धावबाद झाला आणि अखेरच्या षटकांत मुंबईची धावगती खुंटली.केकेआरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर सुनील नरेन भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र, गंभीर आणि लीन यांनी दडपण न घेता फलंदाजी केली. गंभीर बाद झाल्यावर मात्र कोणताही फलंदाज संघाला विजय मिळवून देण्याच्यादृष्टीने खेळपट्टीवर टिकून राहिला नाही. युसुफ पठाणने तीन षटकार लगावत आशा निर्माण केल्या, मात्र मोठी खेळी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. मनीष पांडेचे प्रयत्न योग्य साथ न मिळाल्याने अयशस्वी ठरले. केकेआरने या सामन्यातील पराभवामुळे गुणतक्त्यात तिसरे स्थान गाठले आहे. त्यामुळे केकेआरला आता अंतिम सामन्यात खेळण्यासाठी इलिमिनेटर आणि क्वालिफायर २ या सामन्यांत खेळावे लागणार आहे. प्ले आॅफच्या चौथ्या संघाचा निर्णय रविवारच्या पंजाब विरुद्ध पुणे या सामन्यानंतर लागेल.
मुंबईचा क्वालिफायरमध्ये प्रवेश
By admin | Published: May 14, 2017 7:16 AM