ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - जाहीरात कमाईमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंह धोनी देशात आजही अव्वल स्थानावर असला तरी, मैदानावरील उत्पादन जाहीरातीमध्ये विराट कोहलीने धोनीला मागे टाकले आहे. धोनी बॅटवर स्टीकर लावण्याचे सहा कोटी आकारतो तिथे कोहलीच्या बॅटवर एमआरएफचा स्टिकर आहे. त्याचे विराटला आठ कोटी रुपये मिळतात. त्याशिवाय सरावाच्यावेळी पोषाख आणि बूटांची जाहीरात करण्याचे विराटला आणखी दोन कोटी रुपये मिळतात असे सूत्रांनी सांगितले.
मैदानाबाहेर टीव्ही उत्पादनांच्या जाहीरातीमध्ये अजूनही धोनीच आघाडीवर आहे. धोनी टीव्हीवरील जाहीरातीचे आठ कोटी रुपये घेतो तर, कोहली पाच कोटी आकारतो. सध्या सुरु असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर आयपीएल स्पर्धा सुरु होत आहे. त्यामुळे क्रिकेट किटमधून उत्पादनांच्या जाहीरातीसाठी नव्या खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.
क्रीडा साहित्याचे उत्पादन करणारी जर्मन कंपनी पुमाने बॅट, पोशाख आणि बुटांच्या जाहीरातीसाठी युवराज सिंगला चार कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.सुरेश रैना, रोहित शर्मा बॅटवर सिएटचा स्टिकर लावतात त्याचे त्यांना अडीच ते तीन कोटी मिळतात. अजिंक्य रहाणेला अशाच जाहीरातीसाठी दीड कोटी रुपये मिळतात. भारताचा सलामीवीर शिखर धवनला बॅटवर एमआरएफच्या स्टिकरचे तीन कोटी रुपये मिळतात.