- शिवाजी गोरे पुणे : क्रीडा आणि शिक्षण विभागाला वेठीस धरून भारतीय जनता पक्षाने सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे बिगुल वाजविण्याचा घाट घातला आहे. १ नोव्हेंबर ते १२ जानेवारी दरम्यान सीएम चषक नावाने या क्रीडा स्पर्धा होत आहेत. आयुष्यमान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडान अॅथलेटिक्स , मुद्रा योजना बुध्दिबळ, स्वच्छ भारत कुस्ती आणि कौशल्य भारत कॅरम या नावातूनच आपल्या सरकारच्या योजनांचा प्रसार करण्याचा भाजपाचा मानस स्पष्ट दिसत आहे.राज्याच्या क्रिडा आणि शालेय शिक्षण विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि संघटकांनाही यासाठी जुंपण्यात येईल. खेलो महाराष्टÑ अभियान नावाने या स्पर्धेच्या नियोजनासाठी मंगळवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विशेष मार्गदर्शन सभेचे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत १० क्रीडा व ५ सांस्कृतिक स्पर्धाही होतील. त्यांची नावेही भाजपा सरकारच्या विविध योजनांचीच देण्यात आली आहे. उज्वला नृत्य स्पर्धा, जन-धन एकांकिा स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, ग्रामज्योत काव्यवाचन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा व मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा नावाने स्पर्धा रंगतील. ‘खेलो इंडीया’च्या धर्तीवर होत असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षांपर्यंत वयोगट असेल. नवमतदार जोडण्याचा भाजपाचा हा कार्यक्रम आहे, मग त्यासाठी आम्हाला जुंपण्याचे कारण काय असा प्रश्न क्रीडा अधिकाºयांनी केला आहे.क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे तालुका व जिल्हा पातळीवर करण्यात येते. परंतु, आगामी निवडणुकांमुळे या स्पर्धा होत असल्याने प्रथमच विधानसभा मतदारसंघ निहाय स्पर्धा होतील. आॅलिम्पिंक व आशियाई तयारीच्या दृष्टीने उद्योनमुख खेळाडूंना प्रोत्साहन व देशाची क्रीडा महाशक्ती निर्माण व्हावी हा या स्पर्धांचा प्रमुख उद्देश असल्याचे म्हटले आहे.>मुख्यमंत्री कार्यालयातून क्रीडा समन्वयकया स्पर्धांसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर क्रीडा समन्वयकाची नेमणूक होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नेहरू युवा केंद्राचे सदस्य आणि क्रीडा शिक्षक समितीसोबत हे समन्वयक काम करणार आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय समितीची बैठक घेण्यात यावी. स्थानिक खेळाडू, क्रीडा मंडळे, एकविध खेळ संघटना यांचे सहकार्य घ्यावे. प्रायोजकत्व मिळवावे, असेही सांगण्यात आले आहे.खेलो महाराष्टÑ स्पर्धेची बैठक मंगळवारी होणार आहे. क्रीडा खात्यातील अधिकाºयांबरोबर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी चर्चा करणार आहेत. स्पर्धा विधानसभा मतदारसंघ निहाय होतील.- आमदार योगेश टिळेकर, समन्वयक, सीएम चषक खेलो महाराष्टÑ स्पर्धा
सीएम चषक क्रीडा स्पर्धांतही जाहिरातबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:16 AM