ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 25 - मोठ्या दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या व्हिएतनामचा ५-० ने धुव्वा उडवत इराणने १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. एवढेच नव्हे, तर त्यांनी आगामी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एएफसी चषकातील उपांत्य फेरीसाठी इराण-व्हिएतनाम संघ मैदानात उतरले होते. उभय संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र, इराण हा सुरुवातीपासूनच वरचढ वाटत होता. सावध आणि सुसूत्रताबद्ध खेळ करीत इराणने सुरुवात केली. पहिल्या हाफमध्ये इराणच्या अली गुलाम जादेह याने ३० व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या बाजूने व्हिएतनामने गोल नोंदवण्याचे प्रयत्न केले. मात्र, इराणचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.
मध्यंतरानंतर इराण संघाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या मोहम्मद घादेरीने ४७व्या मिनिटाला गोल नोंदवला. त्यानंतर बदली खेळाडू अलिरजा असादबदीने ६२ व्या, अमीर खोदमोरादीने ६९ व्या आणि अली गुलाम जादेह याने ७२ व्या मिनिटाला गोल नोंदवला. व्हिएतनामने सुरुवात चांगली केली होती. मात्र, इराणच्या पहिल्या गोलनंतर त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता. दबाव न सहन करणाऱ्या व्हिएतनामला पुनरागमन करता आले नाही.