नवी दिल्ली : लांबउडीतील खेळाडू एम. श्रीशंकर आणि २० किमी चालण्याच्या शर्यतीचा खेळाडू केटी इरफान यांच्या फॉर्ममधील घसरणीनंतरही भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय) त्यांना ऑलिम्पिक पथकातून बाहेर केलेले नाही. तथापि, टोकियोत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा शुक्रवारी दिला. एएफआयच्या निवड समितीने शुक्रवारी तातडीच्या बैठकीत २६ सदस्यांच्या संघातून दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता न दाखविण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला. बेंगळुरू येथे अलीकडे चाचणीच्या वेळी केलेल्या खराब कामगिरीमुळे या दोन खेळाडूंना बाहेर करावे, असे काहींचे मत होते. पण चाचणीचे आयोजन फिटनेससाठी करण्यात आले, फॉर्म पाहण्यासाठी नव्हे, असे समितीचे मत होते.
बुधवारी साई केंद्रात झालेल्या फिटनेस चाचणीत श्रीशंकरने केवळ ७.४८ मीटर लांबउडी घेतली. मार्चमध्ये फेडरेशन चषकात त्याने ८.२६ मीटरची नोंद करीत टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली होती. इरफानची फिटनेस चाचणी ९ जुलैला झाली. मार्च २०१९ ला जपानच्या नोमी शहरात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करीत इरफान टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्याने रांची येथील राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता, मात्र शर्यत पूर्ण करू शकला नव्हता. मेमध्ये इरफानला कोरोना झाला होता.
भारताचे २५ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून ४४ जण शुक्रवारी सायंकाळी टोकियोकडे रवाना झाले. ॲथ्लेटिक्समध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा भालाफेकपटू नीरज चोप्राकडून असेल. तो कोच आणि फिजिओसोबत २६ जुलै रोजी स्वीडनमधील सरावातून थेट टोकियोत दाखल होणार आहे. ऑलिम्पिक ॲथ्लेटिक्सचे आयोजन ३० जुलै रोजी सुरू होईल. ते ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
कठोर संदेश सर्वांसाठी
एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, ‘श्रीशंकर आणि इरफान या दोन्ही खेळाडूंच्या कोचेसकडून चाचणीतील खराब कामगिरीबाबत जाणून घेतले. दोघांनीही टोकियोत सर्वोत्कृष्ट कामगिरीची हमी दिली आहे. श्रीशंकरचे वडील हेच त्याचे कोच आहेत. दोन्ही खेळाडूंनी टोकियोत चांगली कामगिरी न केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. हा संदेश टोकियोत सहभागी झालेल्या सर्वच ॲथ्लीटसाठी असेल.’