- एबी डिव्हिलीयर्स लिहितो...दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंना आयपीएल स्पर्धा नक्कीच आवडते. माझ्या मते, याचे उत्तर आमच्या सर्वांकडून एकसारखे असेल. अनेक बाबींमध्ये आयपीएल स्पर्धेमुळे आमच्या खेळाचा दर्जा उंचावला आहे. खेळाचा दर्जा उच्च असून, स्टार खेळाडूंचा समावेश असलेले अनेक फ्रॅन्चायसी संघ अनेक आंतरराष्ट्रीय संघांना पराभूत करण्यास सक्षम आहेत. नवे तंत्र आणि चाहत्यांचा उत्साह प्रत्येक सामन्यात दिसून येतो. येथे आम्ही आर्थिक बाबींकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. अनेक खेळाडू वर्षातील उर्वरित दिवसांच्या तुलनेत या सात आठवड्यांमध्ये अधिक कमाई करीत असल्याचे दिसून येते. दक्षिण आफ्रिकेला आयपीएलच्या प्रभावाची ओळख व महत्त्व फार पूर्वीपासूनच कळलेले आहे. याचे सर्वस्वी श्रेय दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला मिळायलाच हवे. खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळता यावे यासाठी बोर्डाने आंतरराष्ट्रीय कार्यक्रम निश्चित करताना दखल घेतली आहे. काही देशांनी मात्र आयपीएल स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खेळाडूंना आयपीएलपासून दूर राहावे लागते. आयपीएलच्या नवव्या पर्वात दक्षिण आफ्रिकेचे किमान १५ खेळाडू खेळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये माझा मायदेशातील सहकारी डेव्हिड वीस आहे. तो चांगला अष्टपैलू आहे. आता तबरेज शम्सी जुळला आहे. त्याने आपल्या पहिल्याच षटकात धोनी व रहाणे यांच्याविरुद्ध गोलंदाजी केली. जेपी ड्युमिनी, क्विंटन डी कॉक व ख्रिस मॉरिस दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता लवकरच आपल्याला इम्रान ताहिरचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. फाफ डू प्लेसीस कुठल्याही संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात सलामीवीराची भूमिका बजावत आहे. पुणे संघात लवकरच एल्बी मॉर्केल सहभागी झाल्याचे दिसून येईल. त्याने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. केकेआर संघात मॉर्ने मॉर्केलच्या रूपाने विश्व दर्जाचा गोलंदाज आहे. मी काही दिवसांपूर्वी गुजरात लायन्स संघातर्फे डेल स्टेनला अचूक मारा करताना बघितले आहे. तो लवकरच संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार म्हणून डेव्हिड मिलर चांगली भूमिका बजावत आहे. दक्षिण आफ्रिकेचे केली एबोट व फरहान बेहार्डीन त्याला सहकार्य करण्यासाठी संघात आहेत. मर्चंट डी लाँग मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करीत आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळणे आवडते, याचा मी पुनरुच्चार करतो, अशी भावना सर्वांची असेल, असे मला वाटते. (टीसीएम)
द. आफ्रिकन क्रिकेटपटूंना आयपीएल आवडते
By admin | Published: April 24, 2016 3:51 AM