ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. २ - द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने द. आफ्रिकेला २०० धावांचे आव्हान दिले आहे. भारताने या सामन्यात २० षटकात १९९ धावा केल्या आहेत.
द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या तीन षटकात चांगली खेऴी केली. मात्र चौथ्या षटकात शिखर धवन अवघ्या तीन धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत वाढ करण्यास मोलाची कामगिरी केली. विराट कोहली ४३ धावांवर झेलबाद झाला. त्याला गोलंदाज काईल ऍबॉटने झेलबाद केले. त्यापाठोपाठ लगेचच रोहित शर्माही झेलबाद झाला. रोहित शर्माने ६६ चेंडूत १२ चौकार आणि पाच षटकार लगावत १०६ धावा केल्या. सुरेश रैना १४ धावांवर पायचीत झाला तर अंबाती रायडू शून्य धावेवर धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद २० धावा केल्या, तर अक्षर पटेलने दोन धावा केल्या. द. आफ्रिकेकडून गोलंदाज काईल ऍबॉटने दोन आणि ख्रिस मॉरिसमे एक बळी टिपला.
या सामन्यात श्रीनाथ अरविंदने पदार्पण केले असून अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, स्टअर्ट बिन्नी व अमित मिश्राला विश्रांती देण्यात आली आहे.
भारत :
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, अक्षर पटेल, आर. आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, श्रीनाथ अरविंद
दक्षिण आफ्रिका :
एबी डिव्हिलर्स, हाशिम आमला, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, फरहाद बेहर्डिन, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, काईल ऍबॉट, मर्चंट डी लॉंज, इम्रान ताहीर.