गयाना : फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने कमी धावसंख्येच्या सामन्यात बलाढ्य आॅस्टे्रलियाला ४७ धावांनी नमवले. गोलंदाजांना मदतशीर ठरलेल्या खेळपट्टीवर ५० षटकात दक्षिण आफ्रिकेला केवळ ९ बाद १८९ धावा अशी मजल मारता आली. मात्र यानंतर दक्षिण आफ्रिकेने आॅसी संघाचा ३४.२ षटकात १४२ धावांत खुर्दा उखाडून बाजी मारली.प्रोव्हीडन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. आॅसीच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करुन द. आफ्रिकेला मर्यादित धावसंख्येत रोखले. यावेळी आॅसीचा सहज विजय गृहीत धरला जात होता. मात्र, धावांचा पाठलाग करताना आॅसी फलंदाजी द. आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे ढेपाळली. युवा कागिसो रबाडा (३/१३) याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे आॅसी संघाचे कंबरडे मोडले. तर वेन पार्नेल, इम्रान ताहीर आणि अॅरोन फांगिसो यांनी प्रत्येकी २ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आॅसीकडून सलामीवीर अॅरोन फिंचने सर्वाधिक ७२ धावा फटकावताना एकाकी झुंज दिली. त्याने १०३ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांनी आपली खेळी सजवली. तर तळाच्या फळीमध्ये नॅथन लियॉन याने ३० धावांची झुंजार खेळी केली. तत्पूर्वी, अडखळती सुरुवात केलेल्या द. आफ्रिकेचा डाव १८९ धावांत रोखून आॅसीने चमकदार कामगिरी केली. फरहान बेहरादिन याने ८२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ६२ धावांची खेळी केल्याने संघाला दिडशेचा टप्पा पार करण्यात यश आले. सलामीवीर हाशिम आमला (३५) आणि कर्णधार एबी डिव्हीलियर्स (२२) यांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. जोश हेजलवुड, नॅथन कॉल्टर - नाइल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ बळींसह आफ्रिकेला फटकेबाजीपासून रोखले. (वृत्तसंस्था)
द. आफ्रिकेचा आॅसीला दणका
By admin | Published: June 09, 2016 4:36 AM